Join us
Daily Top 2Weekly Top 5

..तर लाखोंचा मोर्चा काढू; मराठी एकीकरण समितीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 07:24 IST

दादर कबुतरखाना परिसरात तणाव; आम्हाला अटक, त्यांच्यावर काय कारवाई

मुंबई : दादर कबुतरखान्याविरोधात मराठी एकीकरण समिती बुधवारी आक्रमक झाली. कायद्याने बंदी असताना खाद्य टाकणाऱ्यावर कारवाई होत नाही. दुसरीकडे शांततेच्या मार्गाने आंदोलन करताना कारवाई केली जाते, कायदा, महापालिका, पोलिसांच्या विरोधात जाऊन तथाकथित जैन समाज कायदा हाती घेणार असेल तर मराठी माणूस लाखोंचे मोर्चे काढतील, असा इशारा मराठी एकीकरण समितीचे राज्यस्तरीय कार्याध्यक्ष प्रदीप सामंत यांनी दिला.

सकाळपासूनच दादर कबुतरखाना परिसरात प्रचंड पोलिस बंदोबस्त होता. ६-७ मोठ्या पोलिस व्हॅन, एक दंगल नियंत्रण पथक गाडी, महिला पोलिस ताफा असा मोठा फौजफाटा होता. जवळच्या जैन मंदिराबाहेर दोन पोलिस व्हॅन उभ्या होत्या. मंदिराच्या दारावरच पोलिसांची एक तुकडी दक्ष होती. परिसराला छावणीचे स्वरूप आले होते.

मराठी एकीकरण समितीच्या वतीने सकाळी ११:१५ वाजण्याच्या सुमारास दादर कबुतरखान्याजवळ शांततेत आंदोलन सुरू झाले. मात्र, नंतर घोषणाबाजी सुरू होताच पोलिसांनी समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांच्यासह काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर थोड्या वेळातच समितीची दुसरी फळी आंदोलन करण्यास उतरली, त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. साधारण तासभर परिसरात गोंधळाचे वातावरण होते.

समितीच्या तुकडीत 'जीओ और जीने दो' घोषणा 

मराठी एकीकरण समितीची पहिली तुकडी आंदोलनासाठी आल्यावर त्यातूनच एक व्यक्ती कबुतरखान्याच्या समर्थनार्थ 'जीओ और जीने दो', 'लीव्ह अँड लेट लीव्ह' अशा आशयाचे पोस्टर हातात घेऊन पुढे आला. यामुळे पोलिसही बुचकळ्यात पडले. त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. आंदोलनावेळी काही क्षण पोलिस, पत्रकारांमध्ये धक्काबुक्कीही झाली. महिला पत्रकाराच्या पायाला दुखापत झाली. 

टॅग्स :मुंबईमराठी