Join us  

युतीचा विचार सोडा, तुम्ही दिलेली वागणूक विसरणार नाही; रामदास कदमांची भाजपाला चपराक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 1:47 PM

युती करायची की नाही, याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच घेतील.

मुंबईः उत्तर प्रदेश आणि बिहारमधील पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपाला युतीची आठवण होऊ लागलीय. पण, आमच्या टेकूवर सत्ता उपभोगत असतानाही तुम्ही आम्हाला जी वागणूक दिलीय, ती कधीच विसरणार नाही. आम्ही एकटे लढू आणि विधानसभेवर भगवा फडकवू, अशी चपराक शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी भाजपाला लगावली. 

भाजपा-शिवसेनेची पुन्हा युती होईल आणि आम्ही सत्तेवर येऊ, असं विधान राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधिमंडळात केलं. त्याचा रामदास कदम यांनी समाचार घेतला. तुमच्या डोक्यात जे शिजतंय, ते काढून टाका. युती करायची की नाही, याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच घेणार आहेत आणि त्यांनी आधीच स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलाय, असं कदम यांनी सुनावलं.

उत्तर प्रदेश आणि बिहारमधील पोटनिवडणुकांचा निकाल गुरूवारी जाहीर झाला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या लोकसभा मतदारसंघांतच भाजपाचा धुव्वा उडाला. गोरखपूर आणि फुलपूर या दोन्ही ठिकाणी समाजवादी पार्टीचा विजय झाला. भाजपाचा बालेकिल्ला उत्तर प्रदेशातच बसलेल्या पराभवाच्या झटक्यामुळे केंद्रीय नेतृत्वालाही मोठा धक्का बसला आहे. पुढील लोकसभा निवडणुकांसाठी ही धोक्याची घंटा मानले जाते.

गोरखपूरमधून आदित्यनाथ पाच वेळा लोकसभेवर गेले होते. त्यापूर्वी महंत अवैद्यनाथ तीन वेळा जिंकले होते. २७ वर्षांनंतर भाजपाची ही जागा गेली. यावेळी समाजवादी पार्टीचे प्रवीण कुमार निषाद यांनी भाजपाचे उपेंद्र दत्त शुक्ला यांचा २१ हजार मतांनी पराभव केला. फुलपूरमध्ये सपाचे नागेंद्र सिंग पटेल यांनी भाजपाचे कशलेंद्र सिंग पटेल यांचा ५९ हजार मतांनी पराभव झाला. दोन्ही ठिकाणी काँग्रेस उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. 

टॅग्स :रामदास कदमभाजपा