Join us
Daily Top 2Weekly Top 5

कबुतर खान्यांबाबत आरोग्य अन् आस्थेचा विचार करूनच मार्ग काढू : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 07:32 IST

'तो' निर्णय आजचा नाही, १९८८ सालचा - फडणवीस

मुंबई : लोकांचे आरोग्य हे महत्वाचेच आहे, आरोग्याचे रक्षण झालेच पाहिजे. पण समाजाच्या आस्थेचेही विषय आहेत या दोहोंची काळजी घेऊन कबुतर खान्यांबाबत मार्ग काढणे शक्य आहे. कबूतरांसाठी जिथे मानवी वस्ती नाही अशा ठिकाणी खादय देण्याची तसेच, कंट्रोल फिडिंग आदी पर्यायांतूनही मार्ग काढू शकतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितले.

ते म्हणाले, हा वादाचा विषय नाही. १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी काही महापालिकांनी मांसविक्री बंदीचा निर्णय घेतला आहे. हा १९८८ सालचा निर्णय आहे. तो मलाही माहिती नव्हता. तसेच उध्दव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीतही हा निर्णय घेण्यात आला होता. काही लोक आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा मुद्द्यांचा वापर करून समाजात भांडणे लावण्याचा प्रयत्न करत आहेत. पण महाराष्ट्र मजबूत आहे, अशा गोष्टींनी महाराष्ट्र हलत नाही असेही ते म्हणाले.

कबुतरखान्यात काही लोकांना यातही महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संधी दिसते. समाजात भांडण लावण्याचा प्रयत्न होतो. पण ही मुंबईची प्रवृत्ती नाही. महाराष्ट्र इतका मजबूत आहे त्यामुळे तो हलेल व महाराष्ट्रात काही तरी घडेल असा विचार कोणी करू नये. असे गैरसमज पसरविण्याचे प्रयत्न झाले, मात्र त्याने काही होत नाही हे महाराष्ट्राने दाखवून दिल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

कोणी काय खावे यात सरकारला रस नाही 

काही महापालिकांनी १५ ऑगस्ट रोजी मांसविक्री बंदीचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, हा निर्णय आमच्या सरकारने नाही तर १९८८ सालीच घेण्यात आला आहे.

उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होते त्या वेळी देखील हा निर्णय घेतला गेला होता. मलाही याबाबत माहिती नव्हती. मी महापालिका आयुक्तांना विचारणा केली तेव्हा हा निर्णय १९८८ सालचा असल्याचे मला कळाले.

सरकारला कोणी काय खावे हे ठरविण्यात कोणताही रस नाही. काही लोक तर शाकाहारी खाणा-यांना नपुंसक म्हणायला लागले हा मूर्खपणा बंद करायला पाहिजे असा टोलाही त्यांनी संजय राऊत यांना लगावला. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसउच्च न्यायालय