Join us
Daily Top 2Weekly Top 5

नवीन धारावीत आम्हाला मोकळा श्वास घेता येईल; ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केला आशावाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 13:32 IST

मुंबई : धारावीच्या परिवर्तनाचे अनेक दशकांपासून त्यांनी पाहिलेले स्वप्न कागदावरच राहिले होते. परिस्थितीशी त्यांनी जुळवून घेतले, सगळे सहन केले. ...

मुंबई : धारावीच्या परिवर्तनाचे अनेक दशकांपासून त्यांनी पाहिलेले स्वप्न कागदावरच राहिले होते. परिस्थितीशी त्यांनी जुळवून घेतले, सगळे सहन केले. चिखलातील झोपड्यांमध्ये त्यांनी संसार थाटले. झोपडपट्टीधारक या शिक्क्यासह आयुष्य काढले. आता या गोष्टी धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या रूपाने बदलत  आहेत. नव्या धारावीत मोकळा श्वास घेता येईल, असा आशावाद येथील ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केला आहे. मात्र, त्याचवेळी ‘आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी’ ही ओळखही पुसली जाईल, असे त्यांनी सांगितले.

तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरातसारख्या राज्यांतून अनेक जण कुटुंबासह मुंबईत आले. धारावीत विविध लहान व्यवसाय सुरू करत त्यांनी येथे ‘लघु भारता’चे दर्शन घडविले. मात्र, धारावीच्या विकासाची अनेक दशकांची या ज्येष्ठांची प्रतीक्षा आणि संघर्ष संपुष्टात येणार आहे. 

मी धारावीतील चिखलातील पडीत जन्म घेतला, असे शांती नाडार सांगतात. त्यांच्या आई सेल्वी धर्मलिंगम या तामिळनाडूतील तिरुनेलवेली येथून उपजीविकेसाठी मुंबईत आल्या. सेल्वी धर्मलिंगम सांगतात, आमचे घर खारफुटीच्या दलदलीवर बांधलेले होते. पावसात पाय चिखलात रुतत, पण आम्ही त्याला ‘घर’ म्हणत असू. येथे राहणे कठीण होते. पण, याच जागेने जगायला शिकवले. आता वाटते की माझ्या नातवंडांसाठी स्वच्छ, सुंदर धारावी दिसावी. 

गुन्हेगारी टोळ्यांचे वर्चस्व उत्तर प्रदेशातून आलेले मोहम्मद इसहाक शेख सांगतात, येथे गल्ली इतकी अरुंद आहे की, वाराही नीट वाहू शकत नाही. कोणाचा मृत्यू झाल्यास मृतदेह बाहेर काढायलाही त्रास होतो. आता हे सगळे बदलणार आहे. मुकुंदनगरमधील ७० वर्षांचे अशोक चौगुले म्हणतात, मी येथे बेकायदा दारूचे अड्डे, गुन्हेगारी टोळ्यांचे वर्चस्व आणि प्रचंड घाण पाहिली आहे. धारावीत खानावळ चालवणारे सगीर अहमद कुरेशी म्हणतात, माझ्या मेसमध्ये उभे राहायलाही जागा नसायची. आतमध्ये वाकून जावे लागायचे. पण, आता नव्या धारावीचा आराखडा उभा राहत आहे.

रहिवाशांना सोयी-सुविधांचा लाभ असा... > पुनर्विकासानंतर प्रत्येक घरात शौचालयाची सुविधा. > २४ तास पाणी मिळणार आहे. > रस्त्यांचे सक्षम जाळे उभारण्यात येईल.  > खासगी व सार्वजनिक शाळा, दुकाने, आधुनिक रुग्णालये आणि सर्व धर्मियांसाठी जागतिक दर्जाची धार्मिक स्थळे असतील.

टॅग्स :धारावीझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणमुंबई