लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: कोबाल्ट दगडांचा रस्ता, मोकळ्या वातावरणात बसण्याची अल फ्रिस्को डायनिंग पद्धत, रोषणाई यामुळे दक्षिण मुंबईतील काळाघोडा परिसराचे रूपडे पालटले आहे. व्ही. बी. मार्गावरून प्रवेश केल्यावर विशेष प्रकारच्या मोझेक टाईल्स, भित्तिचित्रे आणि शिल्पांमुळे हा परिसर पर्यटकांना पूर्वीपेक्षा अधिक आवडेल, असा विश्वास माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी व्यक्त केला. काळाघोडा परिसराच्या सुशोभीकरणासाठी मुंबई महापालिकेने हाती घेतलेल्या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण होत असल्यानिमित्त नार्वेकर यांनी ही माहिती दिली. तर सुशोभीकरणामुळे आपण पॅरिसमधील रस्त्यावरून तर चालत नाही ना, असा भास होतो, असा अनुभव एका नागरिकाने सांगितला.
या भागात ऐतिहासिक आणि पुरातन खाणाखुणा, वास्तू आहेत. पर्यटकांना ‘हेरिटेज वॉक’चा आनंद घेता यावा, तेथील पुरातन वास्तू न्याहाळता याव्यात या उद्देशाने साईबाबा मार्ग, रोप वॉक लेन, व्ही. बी. गांधी मार्ग/फोर्ब्स स्ट्रीट, रुदरफोर्ड स्ट्रीट आणि बी. भरुचा मार्ग हे पाच रस्ते दर रविवारी सायंकाळी ५ ते रात्री १२ दरम्यान वाहतुकीसाठी बंद करून केवळ पादचाऱ्यांसाठी सुरू ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यानुसार या परिसराचे सुशोभीकरण सुरू आहे. पर्यटकांना हा परिसर आकर्षित करू लागल्याचे नार्वेकर यांनी सांगितले.
वाहनमुक्त परिसर
काळाघोडा परिसरातील रस्ते दर रविवारी संध्याकाळी ५ ते मध्यरात्रीपर्यंत फक्त पादचाऱ्यांसाठीच उपलब्ध असतील. शहरातील ही एकमेव जागा वाहनमुक्त व्हावी म्हणून वाहनमुक्त क्षेत्राची संकल्पना राबविण्यात येत आहे. ही एक नवीन संकल्पना असल्याचे नार्वेकर यांनी नमूद केले.
काळा घोडा परिसरात छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय, जहांगीर आर्ट गॅलरी, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, इन्स्टिट्यूट ऑफ कंटेम्पररी आर्ट आणि एलियाहू सिनेगॉग. यामुळे हा परिसर मुंबईचे कला आणि सांस्कृतिक केंद्र आहे. सुशोभीकरणामुळे आपण पॅरिसच्या रस्त्यांवर तर चालत नाही ना, असे वाटते.-मिता सेठ, स्थानिक नागरिक