Join us
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही संजय राऊतांच्या बोलण्याकडे ढुंकूनही पाहत नाही- देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 18:43 IST

अहंकाराची बाधा  कोणाला झाली आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे.

मुंबई: संजय राऊत यांच्यासारख्या व्यक्तीला आम्ही कधीही महत्त्व दिलेले नाही. प्रसारमाध्यमांनी त्यांना मोठे केले आहे. आम्ही त्यांच्या वक्तव्याकडे ढुंकूनही पाहत नाही, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते रविवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. काही दिवसांपूर्वी राऊत यांनी भाजपावर घणाघाती टीका केली होती. सत्ता असली की कुत्रेही स्वत:ला वाघ समजू लागतात, असे त्यांनी म्हटले होते. यावेळी त्यांना संजय राऊत यांनी भाजपासंदर्भात केलेल्या टीकेविषयी विचारण्यात आले. या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी म्हटले की, संजय राऊतांसारख्या व्यक्तीला आम्ही कधीही महत्त्व दिलेले नाही. माध्यमांमुळे ते मोठे झाले आहेत, असे फडणवीस यांनी म्हटले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवसेना-भाजपा संबंधांवरही भाष्य केले. अहंकाराची बाधा  कोणाला झाली आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे, असे सांगत त्यांनी सेनेवर निशाणा साधला. मोदी सरकारच्या कार्यकाळाला 4 वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मी 80 टक्के विकास, 20 टक्के राजकारण करतो. निवडणुकीत विरोधक अपप्रचार करतात, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर थेट हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रातील 3 कोटी 98 लाख कुटुंबांना गॅस कनेक्शन मिळालं असून, राज्यात 2 कोटी 18 लाख जनधन खाती सुरू करण्यात आली आहे. 15 हजार ग्रामपंचायती इंटरनेटनं आतापर्यंत जोडल्या गेल्या आहेत. 20 राज्यांत पासपोर्ट कार्यालयं सुरू केल्याचं सांगत केंद्रातील मोदी सरकारचंही तोंडभरून कौतुक केले.

टॅग्स :देवेंद्र फडणवीससंजय राऊत