Join us  

आमच्यामुळे तुमचे उत्पन्न वाढले, आता आम्हाला २५ टक्के द्या!, एमएमआरडीएला हवामहसुलात वाटा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2024 12:42 PM

Mumbai News: शिवडी ते न्हावाशेवा या अटल सेतू प्रकल्पामुळे मुंबई आणि नवी मुंबई अधिक जवळ आली आहे. परिणामी अटल सेतू नवी मुंबईत उतरतो त्या भागातील विकासाला चालना मिळणार आहे.

- अमर शैला मुंबई - शिवडी ते न्हावाशेवा या अटल सेतू प्रकल्पामुळे मुंबई आणि नवी मुंबई अधिक जवळ आली आहे. परिणामी अटल सेतू नवी मुंबईत उतरतो त्या भागातील विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिका आणि सिडको यांच्या महसुलातही भरघोस वाढ होणार असून, या वाढीव महसुलातील वाटा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मागितला आहे. या दोन्ही प्राधिकरणांनी त्यांच्या वाढीव महसुलातील २५ टक्के वाटा द्यावा, अशी मागणी एमएमआरडीए करणार आहे.

अटल सेतूमुळे नवी मुंबईतील परिसराचा आगामी काळात झपाट्याने विकास होणार आहे. दक्षिण मुंबईतून ३० ते ३५ मिनिटात चिर्ले परिसरात पोहचणे शक्य झाल्याने या भागात रहिवासी संकुले वाढीला लागणार आहेत. त्यातून अटल सेतूच्या उद्घाटनापूर्वीच या भागातील जमीन आणि घरांच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ होऊ लागली आहे. याचा फायदा सिडको प्राधिकरण आणि नवी मुंबई महापालिकेला होणार आहे. जमीन आणि घरांच्या किमतीतील वाढीमुळे या प्राधिकरणांच्या महसुलात मोठी वाढ अपेक्षित आहे. या वाढीव महसुलातील कमीत कमी २५ टक्के रकमेवर आता एमएमआरडीएने दावा केला आहे.

एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पीय बैठकीय या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडे हा प्रस्ताव लवकरच पाठविला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एमएमआरडीएने हाती घेतलेल्या प्रकल्पांच्या खर्चासाठी निधीची आवश्यकता आहे. मात्र, उत्पन्नात घट झाली असून, एमएमआरडीएला कर्जाचाच तो काही आधार आहे.

एमएमआरडीएने मुंबई महानगरात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेतले आहेत. यासाठी एमएमआरडीएकडून ९२ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले जाणार आहे. आणखीही कर्जाची गरज एमएमआरडीएला भासणार आहे. 

मेट्रो प्रकल्पांच्या संचालनाचा अधिक खर्च पाहता एमएमआरडीएला मेट्रो मार्गिकांमधून अपेक्षित उत्पन्न मिळण्याची शक्यता नाही. तसेच एमटीएचएलवरून २०२२ यावर्षी सुमारे ५० हजार वाहने धावतील, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. 

सद्यस्थितीत सरासरी ३० हजार ते ३५ हजार वाहने धावत आहेत, तर २०३२ मध्ये दरदिवशी १ लाख ३४ हजार वाहने धावण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. ही अपेक्षित वाहन संख्या न गाठल्यास एमएमआरडीएच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे. त्यातून प्रकल्पांसाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी एमएमआरडीएला उत्पन्नाचे स्रोत हवे आहेत.

 

टॅग्स :एमएमआरडीएमुंबईमुंबई महानगरपालिकासिडको