एकमेकांच्या आधाराने अर्धा तास तरंगत होतो; ३ मिनिटांत खेळ खल्लास, तरुणाने कथन केला थरार
By मनीषा म्हात्रे | Updated: December 19, 2024 05:21 IST2024-12-19T05:19:38+5:302024-12-19T05:21:00+5:30
आजूबाजूला काहीजण बुडताना दिसत होते. काही क्षणांपूर्वी आई वडिलांच्या कुशीत असलेले बाळ दुर्घटनेत बेपत्ता झाले.

एकमेकांच्या आधाराने अर्धा तास तरंगत होतो; ३ मिनिटांत खेळ खल्लास, तरुणाने कथन केला थरार
मनीषा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सागरी प्रवासाचा आनंद घेत एलिफंटाच्या दिशेने जाताना नौदलाच्या बोटींचा वेगवान थरार रिल्ससाठी शूट करीत होतो. स्पीड बोटीचा थरार पाहत असतानाच अचानक ती बोट आमच्या बोटीला धडकली. अवघ्या तीन मिनिटांत होत्याचं नव्हतं झालं. बोट कलंडली. सगळीकडे फक्त किंकाळ्या अन् जीव वाचवण्याची धडपड सुरू होती. ३० मिनिटे एकमेकांचा हात पकडून समुद्रात तरंगत होतो, असे या दुर्घटनेतून वाचलेल्या राजस्थानच्या श्रवण कुमारने सांगितले.
श्रवण कुमार त्याचा मित्र जितू चौधरी व नाथा चौधरीसोबत मुंबईदर्शनासाठी आला होता. श्रवण कुमार म्हणाला, 'आमची वरच्या डेकवरून मौजमस्ती सुरू होती. समोरून नौदलाच्या स्पीड बोटीच्या थरारक फेऱ्या सुरू होत्या. आम्ही रिल्ससाठी मोबाइलवर व्हिडीओ शूटिंग करत होतो. चार फेऱ्या मारल्यावर ती स्पीड बोट आमच्या बोटीवर धडकली. एकच हाहाकार माजला. घाबरून सगळ्यांनी एकच पळापळ सुरू केली होती. अवघ्या तीन ते पाच मिनिटांत बोट समुद्रात कलंडली. कोणीतरी फेकलेले लाइफ जॅकेट हाती आले. मात्र तेही लहान मुलाचे निघाले. शेवटी हाती एक क्रेट लागले. त्याचा आधार घेतला.
आईच्या कुशीतले तान्हुले बेपत्ता
आजूबाजूला काहीजण बुडताना दिसत होते. काही क्षणांपूर्वी आई वडिलांच्या कुशीत असलेले बाळ दुर्घटनेत बेपत्ता झाले. त्याच्या आईने हंबरडा फोडला. आता सगळं संपलं असंच वाटत असताना अखेरीस नौदल दुर्घटनास्थळी आले आणि देवाच्या कृपेने आम्ही वाचलो, असे श्रवण कुमारने सांगितले.
बोट दुर्घटनेनंतर लाइफ जॅकेट देण्यास सुरुवात
बोट दुर्घटनेनंतर एलिफंटावरून परतणाऱ्या अन्य बोटीवरील प्रवाशांना लाइफ जॅकेट देण्यास सुरुवात केल्याचे प्रवाशांनी सांगितले. एलिफंटा फिरण्यासाठी आलेले दुसऱ्या बोटीवरील पर्यटक शिवपूजन मौर्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, सार, ते ते उत्तर प्रदेश येथून कुटुंबासह मुंबई फिरण्यासाठी आले. एलिफंटा फिरत असताना अचानक नातेवाइकांचे काळजीचे फोन सुरू झाले. तेव्हा, प्रवासी बोट उलटल्याचे समजताच आम्हाला धक्का बसला. तेथून आम्ही बोटीने निघालो. तेव्हा काही अंतरावर नौदल अधिकाऱ्यांनी आम्ही सुरक्षित असून, लाइफ जॅकेट घालण्यास सांगितले. त्यानुसार परतताना अर्ध्यावर लाइफ जॅकेट देण्यात आले.
बोटीवर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी...
दुर्घटनाग्रस्त बोटीवर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याचे समोर येत आहे. बोटीवरील प्रवाशांच्या म्हणण्यानुसार बोट पूर्ण भरली होती. तसेच लाइफ जॅकेट किंवा स्रक्षेसंबंधित कोणत्याही वस्तू किंवा सुविधा प्रवाशांना पुरविण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे या दिशेनेही पोलिस तपास करीत आहेत. मात्र, बोट मालकाने जास्तीचे प्रवासी नसल्याचा दावा केला आहे.