Join us  

आम्हाला जिंकण्यासाठी कोणत्याही 'पोस्टरबॉयची' गरज नाही; 2019 मध्ये स्वबळावरच लढणार- उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 8:17 AM

पंतप्रधान मोदी हे जगभ्रमणावर तर राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे देशभ्रमणावर आहेत.

मुंबई: भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आमच्याशी 'संपर्क' करण्याचा प्रयत्न केला तरी, 2019 मध्ये शिवसेना स्वतंत्रपणेच लढेल, अशी निर्णायक भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. त्यामुळे आज मातोश्री येथील उद्धव आणि अमित शहांच्या बैठकीत काय घडणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अमित शहा व उद्धव ठाकरे यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून भूमिका मांडण्यात आली आहे. यामध्ये शिवसेनेने नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या संधीसाधू कार्यपद्धतीवर निशाणा साधण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाने एक व्यापक संपर्क मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार पंतप्रधान मोदी हे जगभ्रमणावर तर राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे देशभ्रमणावर आहेत. एनडीएतील घटक पक्षांना श्री. शहा भेटणार आहेत म्हणजे नक्की काय करणार आहेत? व ते नेमके आताच म्हणजे पोटनिवडणुकांत भाजपची धूळधाण उडाल्यावरच का भेटत आहेत, हासुद्धा प्रश्नच आहे. २०१९च्या निवडणुका शिवसेना स्वतंत्रपणे लढणारच आहे. पालघर पोटनिवडणुकीतील निकालाने शिवसेनेचे ‘स्व’बळ दाखवून दिले आहेच. तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या या संपर्क अभियानामागे २०१९च्या सार्वत्रिक निवडणुका हे एक कारण होऊ शकते; पण मुळात सरकार पक्षाचा जनतेशी संपर्क तुटला आहे व त्यामागची कारणे शोधायला हवीत. शिवसेनेसारखे पक्ष हे कायम जनसंपर्क, जनाधार यावरच वाटचाल करीत असतात व त्यांना निवडणुका जिंकण्यासाठी, लढण्यासाठी कोणत्याही ‘पोस्टर बॉय’ची गरज नसते. गरजेनुसार पोस्टरवरची चित्रे बदलायची व मते मागायची हे धंदे आम्ही केले नाही, असा टोला शिवसेनेने भाजपाला हाणला आहे. त्यामुळे आता शहा-ठाकरे भेट केवळ औपचारिकता ठरणार की उद्धव यांचे मनपरिवर्तन करण्यात शहा यशस्वी ठरणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाअमित शाह