Join us  

कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आम्ही सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 1:18 PM

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) च्या स्थापनेला १० मार्च रोजी ५० वर्षे पूर्ण झाली़ त्यानिमित्ताने दिल्लीमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्ताने सीआयएसएफच्या पश्चिम विभागाचे महानिरीक्षक संजय खंदारे यांच्याशी साधलेला संवाद

- खलील गिरकर

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) च्या स्थापनेला १० मार्च रोजी ५० वर्षे पूर्ण झाली़ त्यानिमित्ताने दिल्लीमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्ताने सीआयएसएफच्या पश्चिम विभागाचे महानिरीक्षक संजय खंदारे यांच्याशी साधलेला संवादप्रश्न - देशातील सध्याच्या ताणतणावाच्या परिस्थितीत सीआयएसएफ समोरील आव्हानात वाढ झाली आहे का, सीआयएसएफची वाटचाल कशी झाली?- देशातील परिस्थितीमुळे सीआयएसएफ समोरील आव्हानांमध्ये निश्चितच वाढ झाली आहे, मात्र आम्ही कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पूर्णत: सज्ज आहोत. सीआयएसएफची १० मार्च १९६९ मध्ये स्थापना झाली़ त्यावेळी ३ हजार जवान व अधिकाऱ्यांसोबत सुरु झालेला प्रवास आता १ लाख ५५ हजार जवान व अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला आहे. पश्चिम विभागामध्ये महाराष्ट्र, गोवा, गुजरात व मध्यप्रदेशच्या काही भागाचा समावेश होतो. यामध्ये १० हजार जवान कार्यरत आहेत. देशभरात ३४१ विविध ठिकाणी सीआयएसएफ आपली सेवा देत आहे. मुंबईत ९ महत्त्वपूर्ण ठिकाणी सीआयएसएफ सुरक्षेचे काम पाहते़ त्यामध्ये ओएनजीसी, मुंबई पोर्ट ट्रस्ट, जेएनपीटी, आरसीएफ, माझगाव डॉक यासह विविध ठिकाणांचा समावेश आहे. देशभरातील ५९ ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ठिकाणांची सुरक्षा करण्याची जबाबदारी सीआयएसएफवर आहे़ त्यामध्ये लाल किल्ला, ताज महल यासह विविध ठिकाणांचा समावेश आहे.प्रश्न - सीआयएसएफमध्ये महिलांचे प्रमाण किती आहे?- निमलष्करी दलांपैकी सर्वात जास्त महिलांचे प्रमाणे सीआयएसएफ मध्ये आहे. विमानतळ व इतर ठिकाणी आम्हाला महिलांची तपासणी करावी लागत असल्याने महिला जवानांचे प्रमाण लक्षणीय आहे.

प्रश्न - अति महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षेची जबाबदारी असल्याने सीआयएसएफच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण किती प्रमाणात असतो, त्याचा आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ नये यासाठी काय उपाययोजना करण्यात येते?- अति महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा अबाधित ठेवण्याची गरज असल्याने सीआयएसएफला नेहमी दक्ष राहावे लागते. त्याचा काहीसा ताण येत असतो़ कामाच्या ताण तणावाचा आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ नये याची काळजी घेतली जाते. शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम राहण्यासाठी दररोज व्यायाम व कसरती करुन घेतल्या जातात, योग व विविध खेळ खेळण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. एखादी तक्रार असल्यास मोबाईल अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून तक्रार वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याची सुविधा देण्यात आली आहे. एम अ‍ॅप, मेल या माध्यमातून तक्रार नोंदवता येते. सैनिक संमेलनामध्ये तक्रारी मांडल्या जातात. जवान, अधिका-यांना भेडसावणा-या समस्या त्वरित मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जातो.

प्रश्न - सुवर्ण महोत्सवी वर्ष कसे साजरे केले ?- सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त वर्षभर विविध उपक्रम राबवण्यात आले. त्यामध्ये वृक्षारोपण, अवयव दानाची शपथ घेणे, स्वच्छता मोहिम राबवणे यासह अनेक उपक्रम राबवण्यात आले. कर्मचाºयांकडून कधीही चूक होऊ नये यासाठी अनेकदा मॉक ड्रिल करण्यात येते.

टॅग्स :मुंबईभारत