वाझेने सराफा व्यावसायिकाकडून घेतले २५ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:06 AM2021-03-25T04:06:50+5:302021-03-25T04:06:50+5:30

रक्कम उसनी घेतल्याचा दावा; हॉटेलमधील रूम बुक करण्यासाठीही याच मित्राची मदत लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : स्फोटक कारप्रकरणी अटकेत ...

Waze took Rs 25 lakh from a bullion dealer | वाझेने सराफा व्यावसायिकाकडून घेतले २५ लाख

वाझेने सराफा व्यावसायिकाकडून घेतले २५ लाख

Next

रक्कम उसनी घेतल्याचा दावा; हॉटेलमधील रूम बुक करण्यासाठीही याच मित्राची मदत

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : स्फोटक कारप्रकरणी अटकेत असलेल्या निलंबित एपीआय सचिन वाझे याच्याबद्दल नवनवीन माहिती समोर येत आहे. त्याने अटकेच्या काही दिवसांपूर्वी एका सराफा व्यावसायिकाकडून २५ लाख रुपये घेतले होते. ३ महिन्यांसाठी त्याने उसने म्हणून ही रक्कम घेतली होती, त्याचप्रमाणे हॉटेल ट्रायडंटमधील रूम याच मित्राने बुक करून दिल्याचे त्याने तपास अधिकाऱ्यांना सांगितल्याचे समजते.

एनआयएला त्याच्या माहितीबद्दल संशय असल्याने त्याबाबत संबंधित सराफाकडे लवकरच शहानिशा केली जाणार आहे, हा आर्थिक व्यवहार त्याने वसुलीतून केला आहे का, याचाही उलगडा त्यातून होईल. वाझे हा सुशांत सदाशिव खामकर या नावाने १६ ते २० फेब्रुवारीदरम्यान हॉटेल ट्रायडंटमध्ये थांबला होता. खामकर याच नावाने त्याने बनावट आधारकार्ड बनवून त्यावर त्याचा फोटो लावला होता. हाॅटेलमधील ही रूम एका सराफा व्यावसायिक मित्राने त्याच्यासाठी खामकर या नावाने बुक केली होती. त्याच्याकडून त्याने २५ लाख रोकडही घेतली होती. एनआयएने जप्त केलेल्या मर्सिडीजमध्ये सापडलेली साडेपाच लाखांची रोकड ही त्यातलीच असल्याचे त्याने सांगितले. मात्र, इतकी रक्कम कशासाठी घेतली, याबद्दल वाझे समाधानकारक माहिती देऊ शकला नसल्याचे समजते. त्यामुळे त्याने यासंबंधी ज्या ज्या व्यक्तींची नावे घेतली आहेत, संदर्भ दिला आहे, त्या सर्वांकडे विचारणा केली जाणार आहे.

* सुशांत खामकर आहे तरी काेण?

स्फोटक कार प्रकरणात या सर्व बाबींचा काय संबंध आहे, जिलेटीनच्या कांड्या नागपूरमधील एका कंपनीच्य आहेत. त्या घेण्यासाठी यातील रकमेचा वापर केला का, याबद्दल शहानिशा केली जात असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. सुशांत खामकर या नावाने वाझे हॉटेलमध्ये राहात हाेता. या नावाची व्यक्ती आहे का, याचीही शहानिशा केली जात असल्याचे एनआयएच्या सुत्रांनी सांगितले. दरम्यान, हॉटेलचे संबंधित सीसीटीव्ही फुटेज व अन्य वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

---------------------

...........................

Web Title: Waze took Rs 25 lakh from a bullion dealer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.