लिंकिंग रोडचा मार्ग बदलणार
By Admin | Updated: November 6, 2016 03:49 IST2016-11-06T03:49:59+5:302016-11-06T03:49:59+5:30
मुंबईतील रस्त्यावरचे शॉपिंग हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काही महत्त्वाच्या बाजारांपैकी एक असलेल्या वांद्रे लिकिंग रोडवरील बाजार लवकरच हलविण्यात येणार आहे.

लिंकिंग रोडचा मार्ग बदलणार
मुंबई : मुंबईतील रस्त्यावरचे शॉपिंग हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काही महत्त्वाच्या बाजारांपैकी एक असलेल्या वांद्रे लिकिंग रोडवरील बाजार लवकरच हलविण्यात येणार आहे. या ठिकाणी असलेले स्टॉल्स रस्त्यावर असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे वाहतूककोंडी आणि अपघातांचा धोका वाढल्याने, अखेर पालिका प्रशासनाने लिंकिंग रोडची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतल्याने, अखेर पादचाऱ्यांना मोकळा श्वास घेता येणार आहे.
कपड्यांमध्ये नवीन ट्रेंड, चपला, बॅग यासाठी लिंकिंग रोड प्रसिद्ध आहे. त्यामुळे शॉपिंगवेडे या ठिकाणी हमखास हजेरी लावतात. मात्र, फेरीवाले आणि गिऱ्हाईकांच्या गर्दीमुळे लिंकिंग रोड गजबजले आहे. याबाबत अनेक तक्रारी आल्यानंतर, एच-पश्चिम विभागाने लिंकिंग रोडच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव गेल्याच आठवड्यात मंजूर केला. त्यानुसार, या मार्गावर परवानाधारक फेरीवाल्यांना बसविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
सध्या स्टॉल्सच्या विळख्यामुळे पटवर्धन पार्क हे सार्वजनिक उद्यानही दिसेनासे झाले आहे. हा बदल केल्यानंतर मात्र, या उद्यानाचे प्रवेशद्वार मोकळे होईल.
९७ परवानाधारक फेरीवाले या ठिकाणी आहेत, तर काही अनधिकृत फेरीवालेही आहेत. बेकायदा फेरीवाले परत या जागेवर येणार नाहीत, याची खबरदारी घेतली जाणार आहे.