पाणीसंकट होणार आणखी गडद

By Admin | Updated: September 7, 2015 02:30 IST2015-09-07T02:30:45+5:302015-09-07T02:30:45+5:30

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटत असल्याने शहरावर ओढावलेले पाणीकपातीचे संकट भविष्यात आणखी गहिरे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Waterproof will be darker | पाणीसंकट होणार आणखी गडद

पाणीसंकट होणार आणखी गडद

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटत असल्याने शहरावर ओढावलेले पाणीकपातीचे संकट भविष्यात आणखी गहिरे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. २० टक्क्यांची पाणीकपात थेट ३० टक्क्यांवर जाईल, अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबईला सात तलावांतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. जून आणि जुलै वगळता तलाव क्षेत्रात समाधनकारक पाऊस झालेला नाही. परिणामी तलावांतील पाण्याची पातळी अद्यापही दिलासादायक नाही. भविष्यातील जलनियोजनाचा विचार करीत महापालिका प्रशासनाने यापूर्वीच निवासी क्षेत्रासाठी २० टक्के आणि औद्योगिक क्षेत्रासाठी ५० टक्के पाणीकपात लागू केली आहे. २० टक्के पाणीकपातीमुळे मुंबईकरांचे हाल सुरू झाले असून, विरोधी पक्षांनी पाणीकपातीसाठी सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाला दोषी धरले आहे.
६ सप्टेंबर रोजी सात तलावांत मिळून एकूण ९ लाख ९० हजार ५४८ दशलक्ष लिटर्स एवढ्या जलसाठ्याची नोंद झाली आहे. पुढील आठ महिने मुंबईकरांना पुरेसे पाणी मिळावे म्हणून सर्व तलावांत १ आॅक्टोबर रोजी १४ लाख दशलक्ष लिटर्स पाणी असणे गरजेचे आहे. परंतु सद्य:स्थितीत सप्टेंबरचा पहिला आठवडा कोरडा गेला असून, महिन्याच्या मध्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत तलाव क्षेत्रात समाधनकारक पाऊस झाला तरी १ आॅक्टोबर रोजी सर्व तलावांतील जलसाठा एकूण १४ लाख दशलक्ष लिटर्स असणे अपेक्षित आहे.
दरम्यान, पाऊस पुरेशा प्रमाणात पडला नाही आणि तलावांतील जलसाठ्यात वाढ झाली नाही, तर आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भविष्यातील जलनियोजनाबाबत होणाऱ्या महापालिकेच्या बैठकीत आणखी १० टक्के पाणीकपात
लागू करण्याबाबत विचारविनियम होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पाणीकपातीमुळे अधिकाधिक पाण्याची बचत व्हावी म्हणून महापालिकेच्या जलविभागाच्या वतीने शहरासह उपनगरांत पाणीबचतीचा संदेश देणारे मेळावेही घेण्यात येणार असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Waterproof will be darker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.