वडखळचा पाणी प्रश्न पेटला
By Admin | Updated: May 22, 2014 04:36 IST2014-05-22T04:36:08+5:302014-05-22T04:36:08+5:30
शहापाडा उत्तर पाणीपुरवठा योजनेतील संलग्न असणार्या बोरी, मसद, सिंगणवट, वडखळ, बेणेघाट, कोलवे या गावांसह या परिसरातील वाड्यांना भीषण पाणीटंचाईला सध्या सामोरे जावे लागत आहे.

वडखळचा पाणी प्रश्न पेटला
पेण : शहापाडा उत्तर पाणीपुरवठा योजनेतील संलग्न असणार्या बोरी, मसद, सिंगणवट, वडखळ, बेणेघाट, कोलवे या गावांसह या परिसरातील वाड्यांना भीषण पाणीटंचाईला सध्या सामोरे जावे लागत आहे. पाणी प्रश्नावर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पेण विधानसभा मतदार संघाचे शिवसेना अध्यक्ष अविनाश म्हात्रे व बोरी ग्रामपंचायत सरपंच प्रतिभा अविनाश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली वडखळ नाक्यावर मुंबई-गोवा राष्टÑीय महामार्गावर रास्ता रोको केला. यावेळी करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनाला नियंत्रणात आणण्यासाठी वडखळ पोलिसांनी लाठीचार्ज केला. या प्रकरणी जमावबंदी आदेश प्रतिबंधक उपाययोजना म्हणून ३४ आंदोलकांना वडखळ पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. लोकसभा निवडणुकीत रायगडावर शिवसेनेचा भगवा फडकल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण अशा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समाजाभिमुख प्रश्नांवर म्हात्रे यांनी राज्य सरकारच्या पाणी पुरवठा करणार्या यंत्रणा व येथील जे.एस.डब्ल्यू. स्टील कंपनी प्रशासनाने पाणी प्रश्नावर व खारभूमी बंधारे देखभाल दुरूस्तीसाठी दिलेली आश्वासने न पाळल्याचा रोष धरून थेट वडखळ नाक्यावर राष्टÑीय महामार्ग अडविण्याचा प्रयत्न केला. रास्ता रोको करण्यासाठी केलेल्या आंदोलनामुळे वडखळ पोलीस यंत्रणेची तारांबळ उडाली. सकाळी दहा वाजता या ठिकाणी ६० ते ७० लोकांनी महिलांसह आलेल्या जमावाने रस्त्यावर घोषणा देत ठिय्या आंदोलन केले. जेएसडब्ल्यू कंपनीची कामगार वाहतूक करणारी बस वडखळ नाक्यावर आंदोलकांनी अडविली. बसवर दगडफेक करून बसच्या काचा फोडल्या. पोलीस यंत्रणेने आंदोलक संतप्त होत आहेत, हे लक्षात येताच लाठीचार्ज सुरू केला. आंदोलक व पोलिसांत झटापट होऊ लागली. तासभर या आंदोलनाची एकंदर परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांची जादा कुमक आली व आंदोलकांची धरपकड सुरू झाली. यावेळी महिलांवरही लाठीचार्ज करण्यात आला. अखेर ३४ आंदोलकांना पोलीस व्हॅनमध्ये कोंबून वडखळ पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पाणीटंचाई प्रश्नासाठी व पाणी मिळविण्यासाठी लाठीचार्ज झालेले हे पहिलेच आंदोलन आहे. मात्र पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा शिवसेना संघटनेच्या सर्वच पदाधिकारी व शिवसैनिकांनी निषेध केला आहे. अटक केलेल्या आंदोलकांमध्ये शिवसेना पेण विधानसभा अध्यक्ष अविनाश म्हात्रे, बोरी सरपंच प्रतिभा म्हात्रे व ग्रामस्थांचा समावेश आहे. आंदोलकांच्या जेएसडब्ल्यू कंपनी प्रशासनाकडे कंपनीतर्फे खारभूमी बंधारे दुरूस्ती, खारे पाणी घुसलेल्या जमिनींची आर्थिक नुकसान भरपाई, स्थानिकांना कंपनीत नोकर्या व नळ पाणीपुरवठा योजनेव्दारे पाणी मिळावे अशा मागण्या होत्या. मात्र आंदोलन चिरडल्याने पाणी प्रश्न पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)