पाण्याची उधळपट्टी!

By Admin | Updated: May 17, 2015 23:29 IST2015-05-17T23:29:06+5:302015-05-17T23:29:06+5:30

महापालिकेकडे स्वत:च्या मालकीचे धरण असल्याने शहराला मुबलक पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पाण्याच्या वापरावर कोणतेही निर्बंध

Water utility! | पाण्याची उधळपट्टी!

पाण्याची उधळपट्टी!

कमलाकर कांबळे, नवी मुंबई
महापालिकेकडे स्वत:च्या मालकीचे धरण असल्याने शहराला मुबलक पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पाण्याच्या वापरावर कोणतेही निर्बंध राहिलेले नाहीत. त्यामुळे शहरवासीयांकडून पाण्याची मोठ्याप्रमाणात उधळपट्टी केली जात आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली असून पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन केले आहे.
मोरबे धरण नवी मुंबईकरांना वरदान ठरले आहे. पाण्याचा एक हक्काचा व स्वतंत्र असा स्रोत मोरबेच्या माध्यमातून नवी मुंबईकरांसाठी निर्माण झाला आहे. नवी मुंबईची लोकसंख्या १२ लाखांच्या घरात आहे. बहुसंख्य लोकांना २४ तास पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी दिवसाला ४१५ एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. त्यानुसार मोरबेमधून ४३० एमएलडी पाणी घेतले जाते. त्यापैकी महापालिका सिडकोच्या कामोठे आणि कळंबोली या भागासाठी ४० एमएलडी पाण्याचा पुरवठा करते. एमआयडीसीच्या स्रोतातून ५५ एमएलडी पाणीपुरवठ्याची तरतूद आहे. अशाप्रकारे शहराला मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा केला जातो. मोरबे धरणात सध्या चार महिने पुरेल इतका पाणीसाठा आहे. त्यामुळे तूर्तास पाणी कपातीची शक्यता नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. असे असले तरी अनिर्बंध पाणीवापारामुळे सायबर सिटीवरही पाणी कपातीचे संकट ओढावेल, अशी भीती जाणकारांकडून व्यक्त होत आहे.
सध्या शहरात पाण्याचा मोठ्याप्रमाणात अपव्यय होताना दिसत आहे. गाव गावठाणात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांसाठी सर्रास पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात आहे. अनेक ठिकाणी उद्याने आणि वाहने धुण्यासाठी वारेमाप पाणी खर्ची घातले जात आहे. या प्रकाराला निर्बंध घालण्याचे ठोस प्रयत्न प्रशासनाकडून होताना दिसत नाहीत.

Web Title: Water utility!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.