मुंबईकरांना पाण्याचे नो टेन्शन!
By Admin | Updated: June 27, 2015 01:34 IST2015-06-27T01:34:54+5:302015-06-27T01:34:54+5:30
मान्सूनचा लहरी कल सध्या मुंबईकरांचे टेन्शन वाढवत असला तरी आणखी २५ वर्षांनी पाणीप्रश्न पूर्णपणे मिटण्याची चिन्हे आहेत़

मुंबईकरांना पाण्याचे नो टेन्शन!
मुंबई : मान्सूनचा लहरी कल सध्या मुंबईकरांचे टेन्शन वाढवत असला तरी आणखी २५ वर्षांनी पाणीप्रश्न पूर्णपणे मिटण्याची चिन्हे आहेत़ चार नवीन जलप्रकल्पातून २०४० पर्यंत मुंबईच्या घागरीत २८९१ दशलक्ष लीटर जलसाठा वाढणार असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे़
मुंबईला दररोज ३७५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो़ मात्र मागणीच्या तुलनेत हा पुरवठा कमी असल्याने मुंबईच्या टोकाला व डोंगराळ भागांमध्ये नेहमीच पाणीबाणी सुरु असते़ त्यात पावसाने तलाव क्षेत्रात दांडी मारल्यास मुंबईवर पाणीकपातीचे संकट ओढावते़ या संकटातून मार्ग काढण्यासाठी चार वर्षांपूर्वी तत्कालिन आयुक्त सुबोधकुमार यांनी पाण्याच्या दूरगामी नियोजनाचे धोरण आखले होते़ लालफितीमुळे नवीन जलप्रकल्पांच्या कामाचा वेग मंदावला. चार नवीन धरण बांधण्याच्या प्रकल्पाला पालिका प्रशासन गती देणार आहे़ त्यानुसार पिंजाळ, गारगाई, दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प, पालघर येथे खिडसे परिसरात एक अशी चार धरणे २५ वर्षांमध्ये बांधण्याचे नियोजन पालिकेने केले आहे़ (प्रतिनिधी)