Join us  

जलवाहिनीची जोडणी; कांदिवलीत ‘पाणीबाणी’, पाणी जपून वापरण्याचे पालिकेचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 9:49 AM

जलवाहिनी बदलण्याच्या कामामुळे पुढील आठवड्यात कांदिवली परिसरात २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

मुंबई : जलवाहिनी बदलण्याच्या कामामुळे पुढील आठवड्यात कांदिवली परिसरात २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. २ मे रोजी रात्री १० पासून ३ मे रोजी रात्री १० वाजेपर्यंत आर दक्षिण आणि आर मध्य विभागातील काही परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

मीठ चौकी जंक्शन ते महावीरनगर जंक्शनपर्यंत नवीन जोडरस्त्यालगत अस्तित्वात असलेली १२०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी बदलण्याचे काम सुरू आहे. याअंतर्गत २४ तासांमध्ये जलवाहिनीचे अलगीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे आर दक्षिण आणि आर मध्य विभागातील काही परिसरांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.  

आर दक्षिण विभागातील मीठ चौकी जंक्शन ते महावीरनगर जंक्शनदरम्यानची १२०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी जीर्ण झाली असून, ती बदलण्यात येणार आहे. नवीन जलवाहिनी टाकल्यानंतर भूमिगत गळतीचे प्रमाण कमी होईल आणि जलवाहिनीतील दाब वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे कांदिवली पश्चिम भागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा होईल, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

या परिसरात पाणी नाही -

जनकल्याणनगर, छत्रपती शिवाजी राजे संकुल, म्हाडा वसाहत, लालजीपाडा, के. डी. कंपाउंड, गांधीनगर, संजयनगर, बंदर पखाडी, भाबरेकरनगर, सरकारी औद्योगिक वसाहत, चारकोप गाव, म्हाडा एकतानगर, महावीरनगर, इराणीवाडी, कांदिवली गावठाण, महात्मा गांधी मार्ग, शंकर गल्ली, मथुरदास मार्ग, शांतिलाल मोदी मार्ग, खजुरिया टँक मार्ग, अडुक्रिया मार्ग व आर दक्षिण विभाग हद्दीतील स्वामी विवेकानंद मार्ग (संपूर्ण कांदिवली पश्चिम) व चारकोप म्हाडा (सेक्टर १ ते ९) येथे ३ मे रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

टॅग्स :मुंबईनगर पालिकापाणी टंचाईकांदिवली पूर्व