डोनवत गावात पाणीटंचाई

By Admin | Updated: December 31, 2014 22:22 IST2014-12-31T22:22:27+5:302014-12-31T22:22:27+5:30

तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत समजल्या जाणाऱ्या तांबाठी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

Water shortage in Donewat village | डोनवत गावात पाणीटंचाई

डोनवत गावात पाणीटंचाई

खालापूर : तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत समजल्या जाणाऱ्या तांबाठी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सर्वत्र नववर्षाचे जल्लोषात स्वागत होत असताना डोनवत गावात भीषण पाणीटंचाईमुळे ग्रामस्थ हैराण आहेत. मात्र ही पाणीटंचाई नैसर्गिक नसून मानवनिर्मित असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ग्रामपंचायतीने गावातील पाणीपुरवठा योजनेचे वीज बिल न भरल्याने महावितरणने येथील वीज खंडित केली आहे.
खालापूर तालुक्यात आर्थिक दृष्ट्या मजबूत असणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये तांबाठी ग्रामपंचायतीचा समावेश आहे. डोनवत गावासाठी असणाऱ्या पाणीपुरवठा योजनेचे वीज बिल ग्रामपंचायतीने थकविल्याने दोन दिवसापूर्वी महावितरने पाणी योजनेचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे. डोनवत गावाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. काही महिन्यांपूर्वी देखील बिल न भरल्याने वीज खंडित करण्यात आली असताना पुन्हा एकदा महावितरणने पाणी योजनेवर कारवाई केली आहे .
गावामध्ये पाणी नसल्याने ग्रामस्थांचे हाल सुरु असून अनेकांना खाजगी वाहनांतून पाणी आणावे लागत आहे. महिलांची विहिरींवरून हंड्याने पाणी भरताना दमछाक होत असून पाण्याच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची अनेकदा मागणी करुनही पंचायतीने त्याकडे वारंवार दुर्लक्ष केले आहे. पाणीटंचाई निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता त्याठिकाणी कोणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे ग्रामस्थ अधिकच आक्र मक झाले.

महवितरणने वारंवार बिल भरण्यासाठी ग्रामपंचायतीला पत्रव्यवहार केला आहे. बिल भरण्यासाठी दिलेली शेवटची मुदत संपल्याने वीज पुरवठा खंडित केला असल्याची माहिती वावोशी सहायक अभियंता विशाल सूर्यवंशी यांनी सांगितले आहे तर ग्रामसेवक प्रमोद पाटील यांना वारंवार संपर्क करण्याचे प्रयत्न सुरु असून संपर्क होत नसून पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी योग्य सूचना देण्यात येतील असे गटविकास अधिकारी डी. एन. तेटगुरे यांनी सांगितले .

Web Title: Water shortage in Donewat village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.