स्थानिकांवर पाणीटंचाईचे संकट

By Admin | Updated: May 18, 2015 03:52 IST2015-05-18T03:52:52+5:302015-05-18T03:52:52+5:30

मान्सूनचे आगमन अवघ्या दहा ते पंधरा दिवसांवर येऊन ठेपलेले असतानाच राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्याने तळ गाठला आहे

Water shortage crisis at local level | स्थानिकांवर पाणीटंचाईचे संकट

स्थानिकांवर पाणीटंचाईचे संकट

पेण : मान्सूनचे आगमन अवघ्या दहा ते पंधरा दिवसांवर येऊन ठेपलेले असतानाच राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्याने तळ गाठला आहे. अशी प्रतिकूल परिस्थिती सर्वत्र उद्भवली असतानाच पेणच्या हेटवणे मध्यम प्रकल्पात आजमितीस ७३.५० मीटर पाण्याची पातळी असून येथील स्थानिकांवर मात्र पाणीटंचाईचे गडद संकट आहे. पेण ग्रामीण परिसर यावर्षी पाणीटंचाईच्या समस्येने अधिकच कासावीस झालाय. ४२ गावे ८४ वाड्यांवर सध्या भीषण पाणीटंचाई उद्भवली असून हेटवणे धरणाचे पाणीसाठा स्थानिकांसाठी मृगजळासमानच भासत आहे.
पेण तालुक्यातील ग्रामीण परिसरात सध्या सहा टँकरने पाणीपुरवठा केला जात असून पाणीपुरवठा करणारी झेडपीची ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणा चक्क नापास झाली आहे. दरवर्षी ग्रामपंचायतीसाठी पाणीपुरवठा योजनांचे आराखडे तयार केले जातात. मात्र मुळात आडातच पाणी नसल्याने या नळ पाणीपुरवठा यंत्रणा कोरड्या ठणठणीत पडल्या आहेत. पेणमध्ये आंबेघर व हेटवणे या दोन धरणांत विपुल पाणीसाठा पडून आहे. मात्र हेटवणे व आंबेघरची गंगा वाहती करण्यासाठी नव्याने भगीरथाला जन्म घ्यावा लागेल.
दरवर्षी पाणीटंचाई पाचवीला पूजलेली. पाण्यासाठी महिलावर्गाला टँकरच्या पाण्याची प्रतीक्षा करावी लागते. सारेच राजकीय पक्ष वेळेस मूग गिळून बसतात. कोणीही पाण्यासाठी जनतेच्या पाठीशी उभे राहत नाही. नेते येतात, त्यावेळी मात्र थाटात पाणी योजना मार्गी लावण्याचे फक्त घोषणा होतात. कालांतराने त्या घोषण हवेतच विरूनजातात. राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाणीपुरवठा योजनेची खटपट सुरू आहे.
मात्र त्यासाठी कोणते वर्ष उजाडेल याचा अंदाज लावणे चुकीचे ठरेल. जनता पाणी-पाणी म्हणून आक्रोश करीत आहे, तरीही या आक्रोशाकडे राजकीय नेतेमंडळींना लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. पुढचे दहा दिवस पाण्यासाठी कसोटीचे आहेत. टँकर चार दिवसाआड तर वाड्यावर सात दिवसाआड जातो. जिल्हा परिषदेची टँकरमुक्त रायगड ही घोषणा कागदावर राहिली आहे. हेटवणे धरणाचा शिल्लक पाणीसाठा खारेपाटासाठी आणण्याकामी भक्कम अशी पाणीपुरवठा योजना मार्गी लावणे हे या समस्येवर उत्तर आहे. मात्र याकडे प्रत्यक्षात कोणीही लक्ष देत नाही. येथील जनतेला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. (वार्ताहर)

Web Title: Water shortage crisis at local level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.