Join us  

जलसंपदा विभागाला मिळणार १२,९५१ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2021 6:17 AM

पहिल्यांदाच पाच आकडी निधी; २६ लाख हेक्टरवर सिंचन होणार

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्याच्या जलसंपदा विभागाने पहिल्यांदा पाच आकडी निधी मिळवला आहे. यावर्षी या विभागासाठी तब्बल १२,९५१ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. राज्यपालांचे निर्देश नसतानाही निधी मिळाला असला तरी त्याचे वाटप निर्देशानुसार असेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले आहे. राज्यात जलसंपदा विभागाचे २७८ प्रकल्प सुरू आहेत. त्यामधून २६ लाख ८८ हजार ५७६ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणे अपेक्षित आहे व ८,४७० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण होणार आहे असे असले तरी या विभागामुळे नेमके किती क्षेत्र सिंचनाखाली आले याची आकडेवारी आर्थिक पाहणी अहवालातून गेल्या सात ते दहा वर्षापासून देण्यातच आलेली नाही.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत २६ प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली असून या प्रकल्पांची सुधारित उर्वरीत किंमत २१,६९८.२१ कोटी आहे. सन २०२१-२२ या वर्षात २६ पैकी १३ प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे. बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत ९१ प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली असून या प्रकल्पांची सुधारित किंमत १५,३२५.६५ कोटी आहे. यापैकी १९ प्रकल्प पूर्ण झाले असून त्यातून १ लाख २ हजार ७७९ हेक्टर इतकी सिंचन क्षमता निर्माण झाल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी १ हजार कोटी देण्यात आले असून हा प्रकल्प डिसेंबर २०२३ अखेर पूर्ण करण्यात येणार आहे. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने धरण सुरक्षिततेसाठी धरण पुनर्स्थापना व सुधारणा हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. 

टॅग्स :जयंत पाटीलअर्थसंकल्प