मुरबे गावात पाण्याची समस्या गंभीर
By Admin | Updated: January 9, 2015 22:51 IST2015-01-09T22:51:55+5:302015-01-09T22:51:55+5:30
अकरा हजार लोकवस्ती असलेल्या मुरबे गावात मागील अनेक महिन्यांपासून ग्रामपंचायतीकडून पुरवठा करण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे.

मुरबे गावात पाण्याची समस्या गंभीर
पंकज राऊत ल्ल बोईसर
तारापूर एमआयडीसी पासून अवघ्या आठ कि. मी. दूर व सुमारे अकरा हजार लोकवस्ती असलेल्या मुरबे गावात मागील अनेक महिन्यांपासून ग्रामपंचायतीकडून पुरवठा करण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. ग्रामस्थांना दिवसेंदिवस पाण्याची प्रतीक्षा करावी लागत असून नाईलाजास्तव कूपनलीकेचे दूषीत व बेचव पाणी ग्रामस्थांना प्यावे लागत असल्याने आरोग्याचाही प्रश्न उद्भवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पाणी समस्येमुळे ग्रामस्थ त्रस्त तर ग्रामपंचायत हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे.
एमआयडीसीकडून कुंभवली व मुरबा या दोन्ही ग्रामपंचायतीना एकाच लाईनद्वारे पाणीपुरवठा होत असून ही संयुक्त पाणीपुरवठा योजना आहे तर सदर कनेक्शन हे चार इंचाचे आहे. तारापूर एमआयडीसीची हद्द संपल्या संपल्या कुंभवली गावाच्या सुरुवातीलाच असलेल्या सुमारे एक लाख चौऱ्याण्णव हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीमध्ये चोवीस तास एमआयडीसी कडून पाणी पुरवठा होत असतो. परंतु मीटर मध्ये अडकणाऱ्या कचऱ्यामुळे पाण्याचा फ्लो व दाबही कमी होत असल्याने अपूर्ण दाबाने पाणी मिळत आहे.
कुंभवलीच्या टाकीपासून ते कुंभवलीच्या गावापर्यंत एकच सात इंचाची पाण्याची लाईन असून तीच पुढे सुमारे पाच कि. मी. दूर पर्यंत मुरबे गावापर्यंत जाते. कुंभवलीच्या टाकीपासून या सात इंचाच्या लाईनवरून रामजी नगर, गजानन नगर, ५३ नगर व कुंभवली गाव पुढे वाडी विभाग, तसेच एकलारे गाव इ. ठिकाणी पाणीपुरवठा होतो. मुख्य जलवाहिनीच्या सुरूवातीलाच ही नगरे व गावे असल्याने त्या भागाला मुबलक व पुरेसे पाणी मिळते त्यामुळे पुढे मुरबे गावापर्यंत पाणी येता येता पाण्याच्या प्रमाणाबरोबरच पाण्याचा दाबही कमी होतो.
मुरबे गावात वीस वर्षापूर्वी सुमारे पंच्चावन्न हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यात आली परंतु नित्कृष्ट दर्जाच्या बांधकाम व इतर कारणामुळे गळती सुरू झाल्याने मागील दहा वर्षापासून त्या टाकीचा वापर थांबविण्यात आला आहे तर तीन वर्षापूर्वी सुमारे साठ हजार लिटर क्षमतेची गावाच्या सुरूवातीलाच पेट्रोलपंप जवळ भूजल टाकी बांधण्यात आली मात्र सदर टाकी भरण्याकरीता व पुरवठ्याकरीता लागणाऱ्या अवधीमुळे त्या टाकीमध्ये पाणी न सोडताच सरळ गावात पाणीपुरवठा करण्यात येतो.
पाठपुरावा सुरूच
प्यायचे पाणी नियमीत व पुरेसे मिळत नसल्याने मुरबे ग्रामपंचायत निष्क्रीय असल्याचा दोष ग्रामस्थ देत आहेत तर या बाबतीत ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रज्ञा तरे यांच्याशी संपर्क साधला असता पाणी समस्या आहे हे खरे आहे. परंतु ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही सबंधीत यंत्रणेकडे पत्राद्वारे सतत पाठपुरावा करीत आहोत.
४गावात अ ब क मिळून घरपट्टी धारक दोन हजार असून नळ कनेक्शन धारक १०९९ आहेत. त्यापैकी पाणी बील न भरल्याने सुमारे शंभर ग्राहकांचा तात्पुरता पाणीपुरवठा खंडीत करण्यात आला आहे तर प्रत्येक नळ कनेक्शन धारकांकडून पाणी बिलापोटी प्रती महिना पन्नास रु. आकारले जातात.
४ही पाणी योजना ही मुरबे-कुंभवली संयुक्त असल्याने व कुंभवली गाव हे एमआयडीसी मुळे प्रकल्पग्रस्त असल्याने तसेच तेथील कूपनलीकेचेही पाणी रासायनिक द्रव्यांमुळे प्रदूषीत झाल्याने कुंभवली ग्रामपंचायत पाणीबील भरत नाही. मुरबे ग्रामपंचायत थोडी थोडी भरत आहे. परंतु ही थकबाकी आता १० कोटी ८६ लाख १७ हजार ९८२ रू. पर्यंत पोहोचली आहे.