Join us

मागाठाणेच्या सरोवा कॉम्प्लेक्स येथील पाणी समस्या दिवाळी पूर्वी मिटणार, प्रकाश सुर्वेंच्या पाठपुराव्याला यश

By मनोहर कुंभेजकर | Updated: October 31, 2023 17:16 IST

बृहन्मुंबई महानगरपालिका आणि गृहनिर्माण प्राधिकरण यांच्यामध्ये पाणी बिल भरणावरून ही समस्या होती, त्यामुळे येथील ए आणि बी विंगला जळजोडणी मिळत नव्हती.

मुंबई - मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील कांदिवली ( पू ) प्रभाग क्र.25 सरोवा कॉम्प्लेक्स, ठाकूर विलेज येथील नागरिकांना गेले कित्येक दिवस पाण्याची समस्या भेडसावत होती. पाणी कमी येणे,पाण्याचा दाब कमी असणे,पाणी वेळेवर न येणे,नियमित पाणी पुरवठा न होणे अशी येथील नागरिकांच्या तक्रारी होत्या.

बृहन्मुंबई महानगरपालिका आणि गृहनिर्माण प्राधिकरण यांच्यामध्ये पाणी बिल भरणावरून ही समस्या होती, त्यामुळे येथील ए आणि बी विंगला जळजोडणी मिळत नव्हती. मागाठाणे विधानसभा क्षेत्राचे आमदार-विभागप्रमुख प्रकाश सुर्वे यांच्या प्रयत्नांना यश येवून दिवाळी भेट म्हणून मागाठाणेच्या सरोवा कॉम्प्लेक्स येथील पाणी समस्या लवकर मिटणार आहे.

याबाबत आमदार प्रकाश सुर्वे यांनी पालिका प्रशासन आणि म्हाडा कडे पाठपुरावा केला होता.या संदर्भात त्यांनी म्हाडा प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांची त्यांच्या दालनात येथील सरोवा कॉम्प्लेक्सच्या शिष्टमंडळा सोबत संयुक्त बैठक घेतली. यावेळी संजीव जयस्वाल  यांनी त्वरित बृहन्मुंबई महानगरपालिकेला एकूण चार कोटी रुपये देण्याचे आदेश दिले.त्यामुळे येत्या  काही दिवसातच सरोवा  कॉम्प्लेक्स मधील उर्वरित दोन्हीही विंगला दिवाळी पूर्वी नवीन जल जोडणी देण्यात येणार असून येथील पाणी समस्या कायमची मिटेल अशी माहिती आमदार प्रकाश सुर्वे यांनी दिली.

सदर बैठकीला समता नगर फेडरेशन सचिव रघुनाथ चौधरी,अभिजीत गायकवाड, संजय सावंत,सुभाष कस्तुरी व कार्यालय प्रमुख नरेश आम्ब्रे उपस्थित होते.

टॅग्स :मुंबईपाणी