Join us  

प्लॅस्टिक कचऱ्यांमुळेच धबधबे प्रदूषित

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 5:51 AM

निसर्ग मानवाला नेहमीच खुणावतो. खळाळून वाहणारे धबधबे साद घालू लागतात आणि सहलीचे बेत आखले जातात. परंतु निसर्गाच्या याच मनमोहक रूपाची अनुभूती घेताना अनेक पर्यटक खाऊचे रॅपर, जमा झालेला तत्सम प्लॅस्टिक कचरा तेथेच फेकतात.

- सागर नेवरेकरमुंबई - निसर्ग मानवाला नेहमीच खुणावतो. खळाळून वाहणारे धबधबे साद घालू लागतात आणि सहलीचे बेत आखले जातात. परंतु निसर्गाच्या याच मनमोहक रूपाची अनुभूती घेताना अनेक पर्यटक खाऊचे रॅपर, जमा झालेला तत्सम प्लॅस्टिक कचरा तेथेच फेकतात. यामुळे निसर्ग पर्यायाने पर्यावरण धोक्यात येते. हाच धोका ओळखून ‘एन्व्हायर्नमेंट लाइफ’ या संस्थेने धबधब्यांवर स्वच्छतेसह जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.या संस्थेतर्फे आतापर्यंत सात स्वच्छता मोहीमा राबविण्यात आल्या असून १३ धबधब्यांची स्वच्छता केली आहे. टपालवाडी धबधब्याजवळून ६९० किलो कचरा, जुम्मापट्टी १२० किलो, झेनिथ २२० किलो, पांडवकडा २८० किलो, चिंचोटी ३४० किलो, कोंडेश्वर १ हजार किलो, भिवपुरी २ हजार ५०० किलो, आनंदवाडी (नेरळ) १ हजार ४०० किलो, पळसदरी ६०० किलो, आंबेवाडी १२० किलो, खारघर २३० किलो अशाप्रकारे या एकूण मोहिमेत ७ हजार ५०० किलो कचरा गोळा करण्यात आला. यामध्ये पाण्याच्या बाटल्या, प्लॅस्टिक व थर्माकोलच्या प्लेट्स, प्लॅस्टिक चमचे, प्लॅस्टिक पिशव्या आणि वेफर्स पॅकेट इत्यादी कचरा प्रामुख्याने आढळून आला, अशी माहिती संस्थेचे मुख्य समन्वयक धर्मेश बरई यांनी दिली.शासनाने यासुविधा पुरवाव्यातधबधबा क्षेत्रात दारूबंदी करणे, कपडे बदलण्यासाठी आवश्यक कक्ष बांधणे, शौचालय, कचराकुंडीची व्यवस्था करणे, धबधब्याची माहिती देणारे फलक लावणे, धबधब्याकडे जाण्यासाठी शुल्क आकारणे, सुरक्षारक्षकांची नियुक्ती करणे गरजेचे आहे. या सूचनांचे पत्र संस्थेतर्फे पर्यटन विकास महामंडळाला देण्यात आले आहे. परंतु प्रशासनाने याची अद्याप दखल घेतलेली नाही, अशी माहिती बरई यांनी दिली.पर्यटनाचा दर्जा देण्याची गरज : नैसर्गिक संपत्तीची जपणूक केली नाही तर पर्यावरणाचे पर्यायाने माणसाचेही मोठे नुकसान होईल. त्यासाठीच राज्यात जे छोटे-छोटे निसर्गरम्य पिकनिक स्पॉट आहेत. येथील निसर्गसौंदर्याचे जतन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. सोबतच सरकारने या स्थळांना पर्यटनाचा दर्जा दिला, तर स्थनिक टुरिझममधून राज्याला खूप मोठा निधी निर्माण होईल, असे मत धर्मेश यांनी व्यक्त केले.

टॅग्स :प्रदूषणमुंबई