जल, जमीन, जंगलाचा राजा उपेक्षित
By Admin | Updated: August 16, 2014 00:35 IST2014-08-16T00:35:27+5:302014-08-16T00:35:27+5:30
विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. एकंदरीत राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन आयाराम गयारामाच्या संख्येत सतत वाढ होत आहे

जल, जमीन, जंगलाचा राजा उपेक्षित
दीपक मोहिते, वसई
विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. एकंदरीत राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन आयाराम गयारामाच्या संख्येत सतत वाढ होत आहे. पूर्वी नाराज होऊन पक्ष सोडणाऱ्यांना पुन्हा सन्मानाने पक्षामध्ये प्रवेश देण्याच्या प्रक्रियेला चांगलाच वेग आला आहे. याचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादी पक्षाला बसत आहे. त्या पक्षाचे माजी आमदार कृष्णा घोडा यांनी नुकताच आपल्या समर्थकासह सेनेत प्रवेश केला व त्यांना पालघर विधानसभा क्षेत्रात सेनेची उमेदवारी देण्यात येणार आहे.
एकेकाळी बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डहाणू तालुक्यात राष्ट्रवादीसमोर उमेदवार मिळवण्यापासून अनेक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. त्यामधून ते यातून कसे मार्ग काढतात यावर त्यांचे यश-अपयश अवलंबून आहे. डहाणू मतदारसंघात मार्क्स. कम्यु. पक्षाने सन २००९ मध्ये प्रवेश केला व राष्ट्रवादी पक्षाची घसरण सुरू झाली. स्थानिक पातळीवर काँग्रेस पक्षाच्या नेत्याशी असलेले विळ्या-भोपळ्याचे संबंधही त्यांच्या पिछेहाटीला कारणीभूत ठरले. ग्रामीण भागातील अनेक समस्या बिकट झाल्या असताना येथील नेतेमंडळी केवळ सत्ता स्पर्धेमध्ये मश्गुल राहील. एकीकडे बेफिकिरी तर दुसरीकडे मार्क्स. कम्यु. पक्षाची आक्रमकता अशा कात्रीत सापडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये आमदारकी गमवावी लागली.
या मतदारसंघात सेना-भाजपा युती, राष्ट्रवादी काँग्रेस, मार्क्स. कम्यु. व मनसे अशी चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. गेल्या १५ वर्षांत विकासाला गती देण्याच्या कामात सर्वच राजकीय पक्षांनी स्वारस्य न दाखवल्यामुळे दुखावलेला मतदार येणाऱ्या निवडणुकीमध्ये कुणाला प्राधान्य देईल हे सांगणे कठीण आहे.
डहाणू तालुका हा निसर्गसंपन्न तालुका आहे. निसर्गाची या तालुक्यावर विशेष मेहरबानी आहे. मासेमारी, बागायती शेती मोठ्या प्रमाणात होते. पर्यावरणाचे संतुलन विस्कळीत होऊ नये याकरिता केंद्र सरकारने औद्योगिक बंदी केली आहे, असे असतानाही डहाणूचा जगप्रसिद्ध चिक्कू नामशेष होण्याच मार्गावर आहे. पूर्वी जागतिक बाजारपेठेत डहाणूच्या चिक्कूचा दबदबा होता, तो आता इतिहासजमा झाला. तो वाचवण्याच्या दृष्टीने एकाही राजकीय पक्षाने जाणीवपूर्वक प्रयत्न केले नाहीत. एका बलाढ्य कंपनीसमोर राजकीय पक्षांची हतबलता कशी होते याचा अनुभव डहाणूवासीयांनी घेतला. या प्रश्नी राजकीय पक्ष एकमेकांना दूषणे देऊ शकत नाहीत. कारण यामध्ये सारेच आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत. औद्योगिक बंदी असतानाही बागायती क्षेत्र का घटले? याचा विचार एकाही पक्षाने केला नाही. निसर्गाने भरपूर दिले, परंतु राज्यकर्त्यांने ते गमावले, असेच याचे वर्णन करावे लागेल.