Join us  

"मुंबईतील पूर समस्या हाताळण्यासाठी राज्यात वॉटर ग्रीडची स्थापना करावी"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 3:42 AM

नितीन गडकरी : पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणे शक्य

मुंबई : दरवर्षी पावसामुळे मुंबईत निर्माण होणारी पूरस्थिती आणि त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी राज्य वॉटर ग्रीड स्थापन करण्याची सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

भूमिगत वाहिन्यांच्या माध्यमातून पावसाचे पाणी आणि सांडपाणी शुद्धीकरण करून ठाण्यातील धरणात साठविल्यास शेती आणि दुष्काळी भागात हे पाणी वापरता येईल, असे गडकरी यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. मुंबईत दरवर्षी पुरामुळे प्रचंड नुकसान होते. ही पुरस्थिती हाताळण्यासाठी एकात्मिक आराखड्याची आवश्यकता आहे. योग्य नियोजन केले तर पुराचे पाणी, सांडपाणी आणि गटारांतील पाणी ठाण्याकडे वळवता येईल. शुद्धीकरण प्रक्रियेनंतर हे पाणी धरणात साठवता येईल. त्यातून जलसिंचन, शहराजवळील उद्योग आणि आसपासच्या फलोत्पादन पट्ट्याला पाणी देता येईल, असे गडकरी यांनी आपल्या पत्रात सूचविले आहे. मुंबईतील पुराची समस्या, नाले व्यवस्थापन, सांडपाणी, पिण्याचे पाणी हे सर्व विषय एकमेकांशी निगडित आहेत. त्यामुळे त्याचा एकात्मिक विचार होणड आवश्यक आहे. डांबरी रस्ते पावसात टिकणारे नाहीत. दोन दशकांपूर्वी बांधलेल्या मुंबई-पुणे एक्सप्रेस वे अजूनही सुस्थितीत आहे. याच धर्तीवर, मल:निस्सारण आणि पूराचे पाणी वाहून नेण्यासाठी प्रगत जलवाहिनी प्रणालीसह काँक्रीटचे रस्ते मुंबईत बांधले जाऊ शकतात, असेही गडकरींनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.   

टॅग्स :मुंबईपूरपाऊस