Join us

सर्वांसाठी पाणी, २५० किमीच्या जुन्या जलवाहिन्या बदलणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 11:38 IST

सध्या, मुंबईच्या पाणी वितरण प्रणालीमध्ये ३,००० किमीचे जलवाहिन्यांचे जाळे समाविष्ट आहे.

सुरेश ठमके

मुंबई : मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या जलवाहिन्यांच्या जागी नवीन वाहिन्या टाकण्याची, तसेच वाढत्या लोकवस्त्यांसाठी नव्याने जलवाहिन्या टाकण्याची महत्त्वाकांक्षी योजना पालिका प्रशासनाने आता हाती घेतली आहे. यामध्ये तब्बल नवीन २५० किलोमीटर जलवाहिन्या बसवण्यात येणार असल्याची माहिती आता पालिका प्रशासनाने दिली आहे. यातील जुन्या जलवाहिन्या बहुतांशी ब्रिटिश कालीन असल्याचे आता समोर येत आहे.

सध्या, मुंबईच्या पाणी वितरण प्रणालीमध्ये ३,००० किमीचे जलवाहिन्यांचे जाळे समाविष्ट आहे. मात्र टोलेजंग इमारती उभारल्या जात असताना  पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी पालिकेने एकूण लांबीपैकी १२९.६३ किमीपर्यंतच्या विद्यमान जलवाहिन्या  बदलण्याचा तर नवीन मार्गावर १२३.८७ किमी वाहिन्या बसवण्याचे ठरवले आहे.   यासाठी अस्तित्वात असलेल्या जलवितरण प्रणालीचा विस्तार केला जाणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.

उपनगरांमधील कामे अधिक

नवीन जलवाहिन्या टाकण्याची कामे प्रामुख्याने पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये केली जाणार आहेत, या भागांत अनेक ठिकाणी आजही पुरेसे पाणी मिळत नाही.

गेल्या वर्षी डिसेंबरपर्यंत १५,७३५ परवानगी दिलेल्या नळजोडण्यांपैकी ७,८६८ नवीन नळजोडण्या या ‘सर्वांसाठी पाणी’ धोरणाअंतर्गत मंजूर केल्या आहेत.

येथे केली जाणार कामे

घाटकोपरमधील एलबीएस मार्ग, अंधेरी (पूर्व) येथील महाकाली लेणी रोड, कांदिवली ते बोरिवली (पूर्व) येथील सुधीर फडके फ्लायओव्हर आणि वांद्रे पूर्वमधील अनेक भागांत नवीन जोडण्या दिल्या जाणार आहेत.

याशिवाय विक्रोळी पार्कसाइट हा भाग डोंगराच्या माथ्यावर वसलेला असून येथे योग्य पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे येथे १५ कोटी रुपये खर्चून २२ एमएलडी पाण्याची टाकी बांधण्याचा पालिकेचा विचार आहे.

महापालिकेची महत्त्वाकांक्षी योजना

पूर्व उपनगरातील विक्रोळी पार्क साइट येथे टाकीचे काम

लालबहादूर शास्त्री मार्गालगत एन व एस विभागात नवीन जलवाहिनी

के पूर्व आणि के पश्चिम विभागात नवीन जलवाहिनी व दुरुस्ती

एच पूर्व विभागातील शिरसेकर मार्ग परिसरातील नवीन जलवाहिनी

‘मेट्रोबाधित’ बाणडोंगरी ते सुधीर फडके उड्डाणपुलापर्यंत नवीन जलवाहिन्या

किलोमीटर जलवाहिन्या बदलणार

टॅग्स :मुंबई