मच्छिमारांच्या घरात पाणी
By Admin | Updated: June 19, 2015 21:52 IST2015-06-19T21:52:51+5:302015-06-19T21:52:51+5:30
रौद्ररूप धारण केलेल्या समुद्राने सातपाटीच्या संरक्षण बंधाऱ्याला धडक देत मच्छीमारांच्या घरांचा वेध घ्यायला सुरूवात केल्याने आपले संसार

मच्छिमारांच्या घरात पाणी
पालघर : रौद्ररूप धारण केलेल्या समुद्राने सातपाटीच्या संरक्षण बंधाऱ्याला धडक देत मच्छीमारांच्या घरांचा वेध घ्यायला सुरूवात केल्याने आपले संसार, घरे वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न मच्छीमार कुटुंबे करीत आहेत. आमची सत्ता आल्यास बंधाऱ्याची दुरूस्ती करून देण्याचे भाजपाने निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन हवेतच विरले असून शुक्रवारी माजी राज्यमंत्री राजेंद्र गावितांनी संकटग्रस्त मच्छीमारांची भेट घेतली. यावेळी या बंधाऱ्याच्या डागडुजीसाठी आपण केंद्राकडे २६ कोटी रू. च्या मागणीचा प्रस्ताव पाठविल्याची माहिती यावेळी दिली.
सातपाटी येथील किनाऱ्यालगत राहणाऱ्या मच्छीमारांच्या घरांना २००१ मध्ये तुफानी समुद्री लाटांचा तडाखा बसल्याने केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने लोक कल्याणाच्या २ कोटी ८५ लाखाच्या निधीमधून १३९० मीटरचा बंधारा बांधून देण्यात आला होता. कालांतराने या समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन मोठ मोठ्या लाटा बंधाऱ्याला धडका देऊ लागल्याने बंधाऱ्याला अनेक भगदाडे पडून दगड समुद्रात वाहून गेले. त्यामुळे ५-७ वर्षांपासून समुद्री लाटांनी मच्छीमारांच्या घराना आपले लक्ष्य केले आहे. आपापली घरे तसेच संसार वाचविण्यासाठी मच्छीमार बायका मुलांसह सिमेंटच्या गोणीत माती भरून त्याचे संरक्षण कवच आपापल्या घरासमोर उभे करीत आहेत. परंतु रौद्ररूपी लाटांच्या एका तडाख्यानेच ही संरक्षण कवचे बाजूला फेकुन दिली जात असल्याने दांडापाडा, क्रांतीमंडळ इ. भागातील अनेक मच्छीमारांच्या घरामध्ये पाणी शिरून त्यांचे नुकसान झाले आहे.
सातपाटीचा संरक्षण बंधाऱ्याची दुरावस्था झाल्याने सातपाटी ग्रामपंचायत, दोन्ही मच्छीमार सहकारी संस्था शासनाकडे तो पुन्हा बांधण्याची मागणी करीत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मनोर येथील प्रचार सभेत, राज्यपाल व माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांनी सातपाटीमध्ये तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर मध्ये प्रचार सभेत आम्ही सत्तेत आल्यास मच्छीमारांच्या अनेक समस्यासह सातपाटीच्या संरक्षण बंधाऱ्याच्या डागडुजीसाठी निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले होते. परंतु भाजपा सत्तेत येऊन एका वर्षाचा कालावधी उलटून गेल्यानंतरही या समस्या दूर करण्याबाबत त्यांनी चकार शब्दही काढलेला नाही.
चार दिवसापासून सातपाटी गाव तुफानी लाटांच्या भया खाली वावरत असताना स्थानिक खासदार चिंतामण वनगा आणि पालकमंत्री विष्णू सवरा यांनी मच्छीमारांची साधी विचारपूस करण्याचे सौजन्यही दाखविले नसल्यचे बंधारा बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पाटील यांनी सांगितले. मात्र माजी राज्यमंत्री राजेंद्र गावितानी आज सातपाटीत जाऊन नुकसानग्रस्त मच्छीमार व महिलांची भेट घेतली. त्यांना मदतकार्याची हमी देऊन बंधाऱ्याच्या डागडुजीसाठी आपण केंद्राकडे २६ कोटीच्या निधीची मागणी केल्याची माहिती दिली.
(वार्ताहर)