निवडणुका संपताच पाणीप्रश्न पेटला
By Admin | Updated: May 8, 2015 23:14 IST2015-05-08T23:14:53+5:302015-05-08T23:14:53+5:30
उल्हास नदीतून मुबलक पाणी उचलले जात असतानाही अंबरनाथ शहरात मात्र अपुरा पाणीपुरवठा होत आहे. जीवन प्राधिकरण पाणीप्रश्न सोडवित

निवडणुका संपताच पाणीप्रश्न पेटला
अंबरनाथ : उल्हास नदीतून मुबलक पाणी उचलले जात असतानाही अंबरनाथ शहरात मात्र अपुरा पाणीपुरवठा होत आहे. जीवन प्राधिकरण पाणीप्रश्न सोडवित नसल्याने आता अंबरनाथसाठी एमआयडीसीकडून पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे.
अंबरनाथ शहरासाठी उल्हास नदीव्यतिरिक्त चिखलोली धरणातून सहा एमएलडी आणि एमआयडीसीकडून सहा एमएलडी अतिरिक्त पाणीपुरवठा केला जातो. उल्हास नदीतून उचलण्यात येणारे पाणी ज्या भागात वितरीत होते, त्या भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जावसई, फुलेनगर, कमलाकरनगर, कोहजगाव, चिंचपाडा, नालंदानगर, दीपकनगर, खुंटवली, भास्करनगर, वांद्रापाडा, उलनचाळ, डीएमसी चाळ या भागांत अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.
पाण्यासंदर्भात जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केल्यास त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळत नाही. अनेक भागांत स्वत: नगरसेवक स्वखर्चाने पाणीपुरवठा करीत आहेत. तक्रारी करूनही अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा योजना काढून घेण्याची मागणी जोर धरत आहे. (प्रतिनिधी)