भार्इंदरात पाणीचोरीला चाप!
By Admin | Updated: April 26, 2015 22:44 IST2015-04-26T22:44:24+5:302015-04-26T22:44:24+5:30
पालिकेकडून टँकरद्वारे पुरविण्यात येणाऱ्या पाण्याची चोरी करून ते खाजगी टँकरवाल्यांना विक्री करण्याच्या प्रकाराला चाप लावण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला असून

भार्इंदरात पाणीचोरीला चाप!
राजू काळे, भार्इंदर
पालिकेकडून टँकरद्वारे पुरविण्यात येणाऱ्या पाण्याची चोरी करून ते खाजगी टँकरवाल्यांना विक्री करण्याच्या प्रकाराला चाप लावण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला असून, अशी चोरी आढळल्यास तशी तक्रार करावी, असे आवाहन तिने नागरिकांना केले आहे.
मीरा-भार्इंदर शहराला स्टेमद्वारे ८६ व एमआयडीसी (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) कडून ५० असे एकूण १३६ दशलक्ष लीटर पाणी दररोज मिळत आहे. १२ लाखांवर गेलेल्या लोकसंख्येच्या शहराला होत असलेला पाणीपुरवठा अपुरा असून अलिकडेच एमआयडीसीकडून ७५ दशलक्ष एमएलडी अतिरीक्त पाणी मंजूर करण्यात आले आहे. परंतु प्रत्यक्षात ते शहवासीयांना उपलब्ध होण्यासाठी किमान २ वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पालिकेने गेल्या १० वर्षांपासून नवीन नळ जोडणी देणे बंद केल्याने अनेक विकासक गैरमार्गाने नवीन इमारतींतील रहिवाशांना पाणी पुरवठा करण्याचे प्रयत्न करताना दिसतात. ज्या भागात कमी दाबाने अथवा पाणीच मिळत नाही अशा ठिकाणच्या रहिवाशांना मागणीनुसार पिण्याचे पाणी टँकरद्वारे पुरविले जात आहे. ठेकेदारीवरील खाजगी टँकरने मागणीच्या ठिकाणी पाणी पोहोचविले जात असले तरी अनेक टँकरमधले पाणी तो इच्छितस्थळी जाण्याआधीच बऱ्याच प्रमाणात काढून ते खाजगी विक्रेत्यांना विकले जाते. तर काही ठिकाणी टँकर रिकामा होण्याआधीच तो हलविला जातो. व उरलेले पाणी खाजगी विक्रेत्यांना विकले जाते.
सुमारे ७ वर्षांपूर्वी माजी उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी हा प्रकार उजेडात आणून शहरात सुरु केलेले टँकर पॉर्इंट प्रशासनाला बंद करण्यास भाग पाडले. सध्या भार्इंदर पूर्वेच्या फाटकाजवळील एकमेव टँकर पॉर्इंट सुरु असून मागील प्रकार पुन्हा सुरु झाला आहे. याबाबत अनेक तक्रारी पाणी पुरवठा विभागाला केल्या जात आहेत. परंतु, ठोस कार्यवाही होत नसल्याने पाणी चोरी बिनदिक्कतपणे सुरु आहे. ही चोरी बंद करण्यासाठी भरलेल्या टँकरवर जीपीएस यंत्रणेद्वारे (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम) द्वारे नियंत्रण ठेवले जाणार असून संबंधित टँकर मागणीच्या ठिकाणी किती वेळेत जाणार आहे. तसेच तो रिकामा करण्यासाठी किती वेळ घेत आहे. तो मध्ये कोठे थांबला का यावर नियंत्रण ठेवले जाणार आहे. तसेच टँकरची मागणी करणाऱ्या नागरीकांनी अथवा गृहसंकुलांनी त्यातील पाणी पूर्णपणे टाकीत भरले जाते किंवा नाही त्याच्या तपासणीसाठी आवश्यकतेनुसार कनिष्ठ अभियंत्यांना संबंधित ठिकाणी पाठविले जाणार आहे. जेणेकरुन अर्धवट रिकामा होणाऱ्या टँकरमधील पाणी चोरीवर नियंत्रण आणता येणार आहे. असे प्रकार रोखण्यासाठी नागरीकांनी सुद्धा त्यावर लक्ष ठेवावे असे पालिकेने म्हटले आहे.