मुंबईकरांवर पाणीसंकट अटळ
By Admin | Updated: July 16, 2015 00:12 IST2015-07-16T00:12:03+5:302015-07-16T00:12:03+5:30
पावसाने घेतलेल्या दीर्घ विश्रांतीमुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची जलपातळी खालवली आहे़ त्यामुळे आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तलावांचा आढावा घेऊन

मुंबईकरांवर पाणीसंकट अटळ
मुंबई : पावसाने घेतलेल्या दीर्घ विश्रांतीमुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची जलपातळी खालवली आहे़ त्यामुळे आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तलावांचा आढावा घेऊन पाणीकपातीबाबत निर्णय होईल, असे संकेत पालिका प्रशासनाने दिले आहेत़ यामुळे मुंबईत यावर्षी पाणीप्रश्न पेटण्याची चिन्हे आहेत़
मुंबईत अनेक भागांमध्ये छुपी पाणीकपात लागू असल्याचा संशय सर्वपक्षीय नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकीत आज केला़ वांद्रे व मालाडमधील अप्पापाडा, क्रांतीनगरमधील रहिवासी गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाईचा सामना करीत आहेत़ मात्र याबाबत कोणतेही ठोस उत्तर पालिकेकडून मिळत नसल्याने रहिवासी विभाग कार्यालयावर मोर्चा आणत असल्याची नाराजी सदस्यांनी व्यक्त केली़
अशी कोणतीच छुपी पाणीकपात लागू नाही़ पिसे-पांजरापूर येथील पंपिंग स्टेशनमध्ये वीज गेल्यामुळे काही भागांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली, असे अतिरिक्त आयुक्त डॉ़ संजय मुखर्जी यांनी स्पष्ट केले़ तलावांमध्ये आजच्या घडीला ८४ दिवसांचा जलसाठा आहे़ हीच स्थती कायम राहिल्यास आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात पाणीकपातीचे संकट मुंबईवर कोसळेल, असे संकेतही त्यांनी दिले़ रमजान महिना सुरू असताना मुस्लिम वस्त्यांमध्ये अपुरा पाणीपुरवठा होत आहे़ त्यामुळे या भागांमध्ये जादा पाणी सोडण्याची मागणी समाजवादीचे गटनेते रईस शेख यांनी केली़ मात्र एखाद्या विशिष्ट समाजाला जादा पाणी सोडणे हा इतर समाजावर अन्याय असल्याचे मत भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी व्यक्त केले़
पाण्याची गळती व चोरीमध्ये दररोज ९०० दशलक्ष लीटर जलसाठा वाया जात असतो़ त्यामुळे या जलसाठ्याची बचत करण्यासाठी मोहीम तीव्र करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले़ (प्रतिनिधी)