Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईवर 'पाणी' संकट! गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये रहिवासी आणि पदाधिकाऱ्यांमध्ये होतो वाद 

By मनोहर कुंभेजकर | Updated: April 15, 2023 15:05 IST

भांडूप येथील जलवाहिनीच्या कामानिमित्त मुंबईत १५ टक्के पाणी कपात करण्यात आल्याची घोषणा महापालिकेने केली.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई - भांडूप येथील जलवाहिनीच्या कामानिमित्त मुंबईत १५ टक्के पाणी कपात करण्यात आल्याची घोषणा महापालिकेने केली. परंतु प्रत्यक्षात १५ टक्क्यांहून अधिक कपात मुंबईकरांना सहन करावी लागत आहे. उपनगरातील अनेक सोसायट्यांमध्ये पाण्याच्या कमतरतेमुळे रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यात सोसायटीमध्ये पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध होत नसल्याने समिती पदाधिकारी आणि रहिवासी यांच्यात वादाचे खटके उडल्याचे प्रकार घडत आहेत. 

कांदिवली पश्चिम चारकोप सेक्टर ८ येथे अनेक ठिकाणी पाणी कपातीमुळे बाहेरून टँकर मागवावे लागत आहेत. त्यातही पिण्याचे पाणी आणि बोरिंगचे पाणी वेगवेगळे असल्याने रहिवाशांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. चारकोप येथील म्हाडाची पॅगोडा व्ह्यू सोसायटी आहे. जिथे ११ मजल्याचे ४ विंग आहेत. येथे २०० हून अधिक फ्लॅटधारक राहतात. पाणी कपातीच्या पूर्वी रहिवाशांना मुबलक पाणी पुरवले जायचे. मात्र आता पाणी कपातीमुळे नागरिकांना सकाळी आणि संध्याकाळी प्रत्येकी १ तास पाणी पुरवठा केला जातो. 

पॅगोडा व्ह्यू हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष हेमंत थोरात म्हणाले की, पाणी कपातीमुळे सोसायटीतील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेकडून १५ टक्के पाणी कपातीची घोषणा केलीय परंतु प्रत्यक्षात त्याहून अधिक कपात असल्याने पाण्याची टाकी ४० टक्क्यांहून अधिक रिकामी राहते. त्यामुळे लोकांना ठरवून दिलेल्या वेळेतही पाणी सोडणे कठीण झाले आहे. पाणी कपातीच्या या समस्येमुळे रहिवासी आणि समिती सदस्य यांच्यातही वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. महापालिकेने सोसायटीधारकांसाठी माफक दरात पाणी टँकरची सुविधा द्यायला हवी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. 

अलीकडेच बोरिवली पश्चिमेतील साईबाबा नगर परिसरातील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये गेल्या १५ दिवसांपासून दुषित पाणी येत आहे. एकीकडे पाणी कपात तर दुसरेकडे मिळालेले पाणीही दुषित या दुहेरी संकटात येथील रहिवासी अडकला आहे. दुषित पाणी पुरवठ्यामुळे अनेक नागरिकांचे आरोग्य बिघडले असून त्यांना टायफॉइड आणि गेस्ट्रोचा त्रास होत असल्याचं समोर आले आहे.

याप्रकरणी आर मध्य विभागाच्या जलखात्याच्या सहाय्यक अभियंता रूपा मांडवलकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,मुंबईत 30 तारखेपर्यंत 15 टक्के पाणी कपात आहे.मात्र चारकोप परिसर डेड एन्डला असल्याने येथे 15 टक्यापेक्षा जास्त पाणी कपात आहे.सोसायटीने आमच्याकडे त्यांचे पाण्याचे बील दिल्यावर आम्ही चलन बनवून देवू,त्यांनी खाजगी ट्रॅकरशी संपर्क साधून पाणी घ्यावे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :मुंबई