Join us  

मुंबईवर पाणीसंकट; राखीव साठ्याचा वापर सुरू  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 6:46 AM

जुलै उजाडला, तरी पावसाने जोर पकडलेला नाही. दुसरीकडे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत आता केवळ वीस दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे.

मुंबई : जुलै उजाडला, तरी पावसाने जोर पकडलेला नाही. दुसरीकडे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत आता केवळ वीस दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. परिणामी, आता सरकारच्या भातसा, अप्पर वैतरणातून मुंबईसाठी दररोज अडीच हजार दशलक्ष लीटर राखीव पाणीसाठा वापरण्यात येत आहे.तलाव क्षेत्रात गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस पडला नव्हता. या वर्षी चित्र आणखी विदारक आहे. पाणीसाठा कमी असल्याने पालिकेने नोव्हेंबर, २०१८ पासून दहा टक्के पाणीकपात सुरू केली. जून संपत आला, तरी पाऊस सुरू झाला नाही. परिणामी, पालिकेचे टेन्शन वाढले आहे. सात धरणांतून मुंबईला पाणीपुरवठा होतो. मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार धरणांत ७३ हजार दशलक्ष लीटर पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे मुंबईसाठी भातसा व अप्पर वैतरणातून राखीव साठा घ्यावा लागत आहे.भातसामधून दररोज दोन हजार दशलक्ष लीटर तर अप्पर वैतरणातून ५०० दशलक्ष लीटर पाणी पालिका घेत आहे. याचा अर्थ, मुंबईला रोज केल्या जात असलेल्या ३,५०० दशलक्ष लीटर पाण्यापैकी ७० टक्के पाणी आजघडीला भातसासह अप्पर वैतरणातून घ्यावे लागत आहे.दररोज विविध मार्गांनी २५ टक्के पाणी वाया जाते. प्रतिदिन १६.७ दश लक्ष लीटर एवढे पिण्यायोग्य पाणी वाहने धुण्यासाठी वापरले जाते. मुंबईमध्ये प्रतिमानसी दररोज दीडशे लीटर पाण्याची आवश्यकता आहे, परंतु सध्या १३५ लीटर पाणी प्रतिमानसी मिळत आहे.मुंबईला दररोज तीन हजार ८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र, गेल्या पावसाळ्यात तलावांमध्ये कमी पाणी जमा झाल्यामुळे, मुंबईत सरसकट दहा टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. तलावांमधील जलसाठा कमी होत चालल्याने पाणीटंचाईची अधिकच झळ मुंबईकरांना बसत आहे.

टॅग्स :पाणी टंचाईमुंबई