Join us  

विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी यापुढे वाजणार ‘वॉटर बेल’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 7:23 AM

शालेय विद्यार्थी पुरेसे पाणी पीत नसल्यामुळे त्यांना विविध आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी शाळेत आता तीन वेळा घंटा (वॉटर बेल) वाजविण्यात येणार आहे.

मुंबई : शालेय विद्यार्थी पुरेसे पाणी पीत नसल्यामुळे त्यांना विविध आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी शाळेत आता तीन वेळा घंटा (वॉटर बेल) वाजविण्यात येणार आहे. तसे परिपत्रक शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी काढले.दिवसभरात ठरावीक वेळेच्या अंतराने आवश्यक प्रमाणात पाणी पिणे हे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. मुलांच्या वजन, उंची, वयानुसार त्यांनी रोज दीड ते दोन लीटर पाणी पिणे आवश्यक आहे. मुलांचा दिवसातील पाच ते सात तासांचा कालावधी शाळेत जातो. या कालावधीत शरीराला पाण्याची अनेकदा गरज असूनही अभ्यास, खेळ यामुळे अनेक विद्यार्थी पाणीच पीत नाहीत. अनेक लहान मुले सकाळी घरातून नेलेले पाणी पुन्हा घरी घेऊन येतात. आपली मुले शाळेत पाणी पीत नसल्याच्या अनेक तक्रारी पालक नेहमी करत असल्याचे अनेक सर्वेक्षणातूनही समोर आले आहे.विद्यार्थ्यांनी शाळेच्या वेळेत शरीराला आवश्यक तेवढे पाणी प्यावे आणि त्यासाठी त्याची आठवण व्हावी यासाठी तीन वेळा पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी पाण्याची घंटा (वॉटर बेल) वाजविण्यात येणार आहे. केरळमधील एका शाळेत सगळ्यात आधी वॉटर बेल उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. याच धर्तीवर आता असोसिएशन आॅफ प्रायमरी एज्युकेशन अँड रिसर्च संस्थेने सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत पुणे, दिल्ली, बंगळुरू येथील शाळांमध्ये हा उपक्रम राबविला.

टॅग्स :शिक्षण क्षेत्रविद्यार्थी