पोलिसांचा ३२ केंद्रांवर वॉच
By Admin | Updated: April 20, 2015 01:07 IST2015-04-20T01:07:54+5:302015-04-20T01:07:54+5:30
बुधवारी होणाऱ्या मतदान प्रक्रियेकरिता पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. मतदान केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता ३२ केंद्रांवर पोलिसांचे

पोलिसांचा ३२ केंद्रांवर वॉच
सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई
बुधवारी होणाऱ्या मतदान प्रक्रियेकरिता पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. मतदान केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता ३२ केंद्रांवर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. तर मतदानाच्या दिवशी शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार असून एस.आर.पी.एफ. च्या तीन तुकड्या दाखल झाल्या आहेत.
सर्वच उमेदवारांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा मतदानाचा क्षण अवघ्या दोनच दिवसांवर आला आहे. शांततेत मतदान व्हावे याची खबरदारी घेतली जात आहे. बुधवार, २२ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी शहरात दोन हजार १२५ पोलीस कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. त्याशिवाय ५० पोलीस निरीक्षक, १६१ इतर अधिकारी व सहाय्यक आयुक्त हे देखील मतदानाच्या दिवशी बंदोबस्तावर असणार आहेत. प्रत्येक बुथवर देखील एक पोलीस कर्मचारी पुरवला जाणार असल्याचे विशेष शाखा उपआयुक्त प्रशांत खैरे यांनी सांगितले. शहरात विशेष गस्त घालण्यासाठी ३८ पथके सक्रिय आहेत. बंदोबस्तादरम्यान पोलिसांच्या मदतीला शीघ्र कृती दल, होमगार्ड यांच्याही तुकड्या असणार आहेत. त्याशिवाय राज्य राखीव पोलीस दलाच्या तीन तुकड्याही शहरात दाखल झाल्याचे खैरे यांनी सांगितले. गत लोकसभा व विधानसभा निवडणुकांपेक्षा यंदा जादा पोलीस बंदोबस्त शहरात असणार आहे. त्याकरिता निवडणूक नसलेल्या परिमंडळ २ मधील देखील फौजफाटा वापरण्यात येणार आहे.