बेकायदा बांधकामांवर वॉच
By Admin | Updated: January 10, 2015 02:14 IST2015-01-10T02:14:41+5:302015-01-10T02:14:41+5:30
मुंबईला वेढणाऱ्या बेकायदा बांधकामांवर नियंत्रण ठेवणे आता अशक्यप्राय होत चालले आहे़ या बांधकामांवर कारवाई करावी,

बेकायदा बांधकामांवर वॉच
मुंबई : मुंबईला वेढणाऱ्या बेकायदा बांधकामांवर नियंत्रण ठेवणे आता अशक्यप्राय होत चालले आहे़ या बांधकामांवर कारवाई करावी, तर न्यायालयातून स्थगिती आणून वर्षोन्वर्षे वेळ काढला जातो़ त्यामुळे उपग्रहाच्या मदतीने बेकायदा बांधकाम हुडकून त्यावर कारवाई करण्याचा ठराव पालिकेच्या महासभेत मंजूर झाला आहे़
मुंबईत ५६ हजार बेकायदा बांधकामे असल्याचे पालिकेने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून यापूर्वी मान्य केले आहे़ मात्र मुंबईचा विस्तार वाढत चालला आहे, त्याप्रमाणे येथील बेकायदा बांधकामेही पाय पसरत चालली आहेत़ रातोरात बेकायदा वस्ती उभी राहत असून, कायद्याच्या पळवाटांमुळे त्यावर कारवाई करणेही अवघड होत चालले आहे़ या कारवाईसाठी आवश्यक मनुष्यबळाचा तुटवडा आहेच़ त्याचबरोबर पोलिसांकडून मागविलेले स्वतंत्र पथकही पालिकेला अद्याप मिळू शकलेले नाहीत़
बेकायदा बांधकामांवर नियंत्रण व शहरभर वॉच ठेवण्यासाठी इमॅजरी सॅटेलाईट तंत्रज्ञानाचा वापर सर्व विभाग कार्यालयांमध्ये करण्यात यावा़ जेणेकरून बेकायदा बांधकामांभोवती फास आवळणे शक्य होईल, अशी सूचना काँग्रेसचे नगरसेवक परमिंदर सिंग भामरा यांनी पालिका महासभेत मांडली होती़ ही मागणी महासभेत एकमताने मंजूर करण्यात आली आहे़ मात्र आयुक्तांच्या सकारात्मक प्रतिसादानंतर यावर शिक्कामोर्तब होऊ शकेल़ (प्रतिनिधी)
२०१०मध्ये दहिसर पश्चिम लिंक रोड येथील २ हजार चौ़ फुटांचे बहुमजली बांधकाम बेकायदा असूनही सदर घरमालकाने हे बांधकाम १९७८पूर्वीचे असल्याचा पुरावा दाखविला होता़ मात्र सागरी नियंत्रण क्षेत्र नियमाचे उल्लंघन आणि पालिकेच्या परवानगीशिवाय बांधण्यात आलेला हे बांधकाम बेकायदा असल्याचे उपग्रहाच्या माध्यमातून पालिकेने सिद्ध केले होते़ त्यानंतरच या बांधकामावर कारवाई करण्याची अनुमती पालिकेला मिळाली होती़