कल्याणात वाहतुकीचा बोजवारा

By Admin | Updated: February 6, 2015 23:10 IST2015-02-06T23:10:36+5:302015-02-06T23:10:36+5:30

वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी नेमण्यात आलेल्या वॉर्डनला निळ्या पॅण्टचा गणवेश सक्तीचा करण्यात आला आहे.

Wastelization of welfare | कल्याणात वाहतुकीचा बोजवारा

कल्याणात वाहतुकीचा बोजवारा

कल्याण : वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी नेमण्यात आलेल्या वॉर्डनला निळ्या पॅण्टचा गणवेश सक्तीचा करण्यात आला आहे. परंतु, याविरोधात त्यांनी दंड थोपटले असून कामबंद आंदोलन छेडले आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे.
केडीएमसी परिक्षेत्रात रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत. यामुळे होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांना मदतनीस म्हणून महापालिकेच्या वतीने ट्रॅफिक वॉर्डन देण्यात आले आहेत. दरम्यान, नोव्हेंबरमध्ये झालेल्या पालिकेच्या महासभेत वॉर्डनच्या कार्यपद्धतीबाबत सर्वपक्षीय सदस्यांनी नाराजी व्यक्त केली होती. वॉर्डन हे वाहतूक पोलिसांचे कलेक्टर असल्याचा गंभीर आरोपही या वेळी करण्यात आला होता. यात वॉर्डनचा खाकी गणवेश बदलण्याची मागणीही करण्यात आली होती.
दरम्यान, गुरुवारपासून वॉर्डनने पांढरा शर्ट आणि निळी पॅण्ट असा गणवेश परिधान करावा, असा आदेश वाहतूक विभागाने जारी केला होता. याला वॉर्डनने विरोध दर्शविला असून खाकी गणवेश घालण्यावर ठाम राहण्याची भूमिका घेतली आहे. दरम्यान, निळ्या रंगाच्या गणवेशात वाहनचालक आमचे ऐकणार नाहीत, त्यामुळे खाकी रंगाचीच पॅण्ट असावी, अशी वॉर्डनकडून करण्यात आलेली विनंती वरिष्ठांकडून फेटाळली गेल्याने
अखेर त्यांनी कामबंद आंदोलन छेडले आहे.
दरम्यान, जोपर्यंत पूर्वीचा गणवेश मिळत नाही, तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच राहणार, अशी भूमिका वॉर्डनने घेतली आहे. विशेष बाब म्हणजे त्यांच्या या भूमिकेला काही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिल्याने प्रशासनाची कोंडी झाली आहे. (प्रतिनिधी)

वाहतुकीचा बोजवारा
वाहतूक पोलिसांचे मदतनीस म्हणून काम करणाऱ्या वॉर्डनने आंदोलनाचा पवित्रा घेताच याचा फटका वाहतुकीला बसला. शहरातील रेल्वे स्थानक परिसर, शिवाजी चौक, सहजानंद चौक, मुरबाड रोड अशा महत्त्वाच्या ठिकाणी झालेली वाहतूककोंडी सोडविताना वाहतूक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या गुरुवारी नाकीनऊ आले होते. यासंदर्भात वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता नियमानुसारच वरिष्ठांनी गणवेश सक्तीचा केलेला आहे. वॉर्डनशी आमची चर्चा सुरू असल्याचे ते
म्हणाले.

Web Title: Wastelization of welfare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.