प्रभागात स्वागत होते कचऱ्याने

By Admin | Updated: February 3, 2015 23:16 IST2015-02-03T23:16:10+5:302015-02-03T23:16:10+5:30

प्रभाग क्रमांक २८ वसलेला असून येथे समस्यांचा महापूर आहे. शौचालये असली तरी त्याचा उपयोग होत नसून बहुतेक ठिकाणी रस्त्यावर, उघड्यावर दिवसभर शौचविधी सुरु आहे.

The waste was welcomed in the area | प्रभागात स्वागत होते कचऱ्याने

प्रभागात स्वागत होते कचऱ्याने

अजित मांडके - ठाणे
एमआयडीसीच्या जागेवर प्रभाग क्रमांक २८ वसलेला असून येथे समस्यांचा महापूर आहे. शौचालये असली तरी त्याचा उपयोग होत नसून बहुतेक ठिकाणी रस्त्यावर, उघड्यावर दिवसभर शौचविधी सुरु आहे. विशेष म्हणजे प्रभागात येण्यासाठी कोणत्याही बाजूने प्रवेश केला तरी येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत हे कचऱ्याच्या ढिगाऱ्यानेच होत आहे. महापालिका हद्दीतील सर्वात क्लिष्ट आणि दुर्गंधीने बरबटलेला प्रभाग म्हणूनही या प्रभागाकडे पहावे लागते़
या प्रभागाची लोकसंख्या ही २८ हजारांच्या घरात असून येथे जयभवानी नगर, किणी नगर, अंबिकानगर, राजीव गांधी नगर, नेहरु नगर, शिवशक्तीनगर, महात्मा गांधी नगर, किसनगरचा काही भाग या प्रभागात येतो. येथे ९५ टक्के झोपडपट्टी असून, ५ टक्केच अधिकृत इमारती असून यामध्येही वाणिज्य वापराच्या इमारतींचा समावेश आहे. मुंबई महापालिकेची जलवाहीनीदेखील याच भागातून जाते. त्यामुळे या जलवाहीनीचा धोका या परिसराला आहेच. विशेष म्हणजे ही जलवाहीनी असो अथवा मोकळे रस्ते, गटार, पायवाटा येथे प्रत्येक ठिकाणी दिवसाढवळ्या शौचविधी सुरु असतो. त्यामुळे येथील बहुतेक भागात दुर्गंधी पसरली आहे. परंतु,याकडे कोणाचेही लक्ष नाही़ १५ शौचालये आहेत, परंतु त्याांची दुरुस्ती झालेली नाही. तसेच आहे, त्या शौचालयांमध्ये पाऊल ठेवणेही कठीण
असल्याचे मत येथील रहिवाशी व्यक्त करीत आहेत.
एमआयडीसीचा भूखंड असल्याने येथे सुविधांचा बोजवारा उडाला आहे. सुविधा देतांना आधी एमआयडीसी त्यानंतर पुन्हा पालिकेकडे पाठपुरावा करावा लागतो. त्यामुळे येथील विकास कामांचादेखील बोजवारा उडाला आहे. रस्ते, पायवाटा, गटारे यांची अवस्था दयनीय आहे. विशेष म्हणजे या प्रभागात आपण कोणत्याही प्रवेशद्वारातून प्रवेश केला तर येथे आपले स्वागत हे कचऱ्याच्या ढिगाऱ्याने होते. ठिकठिकाणी कचरा अस्ताव्यस्त पडलेला आहे. परंतु तो वेळेत उचलला जात नसल्याने नागरीकांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागते. प्रभागात एकमेव उद्यान आहे, ते केवळ चांगल्या
स्थितीत आहे. परंतु, त्याच्या
बाजूलाच स्मशानभूमी असल्याने त्याठिकाणी जाळण्यात येणाऱ्या प्रेतांच्या दुर्गंधीचा त्रास उद्यानात फिरण्यास येणाऱ्या नागरीकांना सहन करावा लागतो.
आंबेवाडी, साठेनगर, आदींसह येथील प्रत्येक रस्त्यावर दोन्ही बाजूने अनधिकृत गॅरेजचा बाजार भरलेला आहे. त्यामुळे येथून ये जा करणाऱ्या वाहन चालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. येथील बहुतेक फुटपाथ फेरीवाले, वाचनालये, दुकाने, कार्यालये आदींनी गिंळकृत केले आहेत. परिसरात कामगार रुग्णालय असून त्याची अवस्थादेखील दयनीय आहे. कामगार रुग्णालय वसाहत जीर्ण झाली असून येथील रहिवासी जीव मुठीत घेऊन राहत आहेत. पाण्याची टाकीसुध्दा धोकादायक स्थितीत आहे. प्रभागात स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याने येथे मच्छरांची पैदास वाढून त्यामुळे येथील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न देखील गंभीर झाला आहे.

या प्रभागातील रस्ते, पायवाटा, आदींची कामे सुरु आहेत. तसेच पाण्याचा प्रश्न संपूर्णपणे मार्गी लागावा, यासाठी पालिकेकडे पत्रव्यवहार केला आहे. तसेच कचऱ्याचा प्रश्न ७५ टक्के सोडविला आहे. परंतु, अनधिकृत गॅरेजचा प्रश्न हा गहन असून तो सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
- रामभाऊ तायडे, नगरसेवक, रिपाइं

प्रभाग हा एमआयडीसीच्या जागेवर वसला असल्याने येथे सोई सुविधा पुरवितांना अडचणी येतात. येथील रहिवाशांचे पुर्नवसन व्हावे, म्हणून शासन दरबारी पत्रव्यवहार केला आहे. मोकळ्या जागादेखील उपलब्ध नसल्याने नवीन प्रकल्प उभारता येत नाही. स्मशानभूमीला धुरांडे उभारण्यात यावे यासाठी पालिकेकडे पत्रव्यवहार केला आहे.
- एकता भोईर,
स्थानिक नगरसेविका, शिवसेना

शौचालयांची सफाई नाही, रस्ते पायवाटा,
गटारे यांची अवस्था दयनीय आहे. आरोग्याचा प्रश्न देखील गंभीर आहे. परंतु या बाबींकडे लक्षच दिले जात नाही.
- सुखदेव कांबळे, स्थानिक रहिवासी

Web Title: The waste was welcomed in the area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.