Join us  

Video: ...तेव्हा खासदार होण्यास दिला होता नकार?; सुधा मूर्तींचा तो व्हिडिओ आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2024 1:59 PM

संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच सुधा मूर्ती यांनी संसद सभागृहाला भेट दिली होती.

मुंबई - प्रख्यात उद्योजिका, समाजसेविका आणि लेखिका सुधा मूर्ती यांची राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र यांनी यासंदर्भात ट्विट करून सूधा मूर्ती यांचं अभिनंदन केलं आहे. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी असलेल्या सुधा मूर्ती यांनी त्यांच्या सामाजिक कार्य, उद्योजक आणि लेखनाच्या माध्यमातून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेत त्यांना राष्ट्रपतींकडून खासदारी देण्यात आली आहे. मात्र, काही महिन्यांपूर्वी सुधा मूर्ती यांनी संसद भवनाला भेट दिली होती. त्यावेळी, त्यांना खासदार होण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. आता, त्यांचा तो व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच सुधा मूर्ती यांनी संसद सभागृहाला भेट दिली होती. यावेळी, संसद पाहून झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून आला. खूपच सुंदर... अतिशय सुंदर... वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. मला खूप वर्षांपासून संसदभवन पाहण्याची इच्छा होती. आज माझं ते स्वप्न सत्यात उतरल्याचं वाटत आहे. येथील संसद भवनातील कलाकूसर, संस्कृती आणि इतिहास सर्वकाही अतिशय सुंदर आहे, असे सुधा मूर्ती यांनी म्हटलं होतं. त्यावेळी, खासदार बनून येऊ इच्छिता का?, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर, हात जोडून नम्रपणे सुधा मूर्ती यांनी नकार दिला. तसेच, मी जिथे आहे तिथे आनंदी आहे, असेही त्यांनी म्हटलं होतं. यावेळी, पत्रकारांसह सर्वांनीच हसून दाद दिली. मात्र, आता त्या खरंच खासदार बनून संसदेच्या सभागृहात जाणार आहेत. त्यामुळे, नम्रपणे नकार देणाऱ्या सुधा मूर्ती यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आला आहे. 

पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन

सुधा मूर्ती यांची राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार म्हणून निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुधा मूर्ती यांचं अभिनंदन केलं आहे. त्यात ते म्हणाले की, भारताच्या राष्ट्रपतींनी सुधा मूर्ती यांची राज्यसभा खासदार म्हणून नियुक्ती केल्याने मला आनंद होत आहे. सामाजिक कार्य आणि शिक्षण यासह विविध क्षेत्रात सुधाजींचे योगदान खूप मोठे आणि प्रेरणादायी आहे. सुधा मूर्ती यांची राज्यसभेमधील उपस्थिती हे नारीशक्तीचं शक्तिशाली उदाहरण आहे. राज्यसभेतील उत्तम कारकिर्दीसाठी मी त्याला शुभेच्छा देतो, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

कोण आहेत सुधा मूर्ती

इंजिनीअर, सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका सुधा मूर्ती यांचा जन्म १९ ऑगस्ट १९५० रोजी कर्नाटकातील शिगगाव येथे झाला. भारतीय अभियांत्रिकी शिक्षिका व कन्नड आणि इंग्रजी भाषेतील भारतातील प्रसिद्ध लेखिका म्हणून त्यांची ओळख आहे. सुधा मूर्ती यांनी संगणक शास्त्रज्ञ आणि अभियंता म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्या इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि गेट्स फाउंडेशनच्या सार्वजनिक आरोग्य सेवा उपक्रमांच्या सदस्या आहेत. त्यांनी अनेक अनाथाश्रमांची स्थापना केली, ग्रामीण विकासाच्या प्रयत्नांमध्ये भाग घेतला आहे. कर्नाटकातील सर्व सरकारी शाळांना कॉम्प्युटर आणि ग्रंथालय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या चळवळीला पाठिंबा दिला आणि हार्वर्ड विद्यापीठात द मूर्ती क्लासिकल लायब्ररी ऑफ इंडियाची स्थापना केली. त्या इन्फोसेसचे प्रमुख नारायण मूर्ती यांच्या पत्नी आहेत.  

 

 

टॅग्स :सुधा मूर्तीनरेंद्र मोदीखासदारसंसद