Join us  

मुंबईत मनसेला दे धक्का, महिला नेत्यांचा मंत्री सुभाष देसाईंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 3:38 PM

राज्याचे उद्योगमंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी सुगंधा शेट्ये यांच्या हातात शिवधनुष्य बांधले.शेट्ये यांनी १९९२ ते १९९७ आणि २००२ ते २००७ पर्यंत शिवसेनेचे नगरसेवकपद भूषवले होते.

ठळक मुद्देमाझा मूळ पिंड हा शिवसेनेचा आहे. शिवसेनाप्रमुख हे माझे आराध्य दैवत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीने मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणात आला. त्यांच्या कामगिरीवर मी भारावून गेले आणि शिवसेनेत परत आले

मुंबई - २०२२ च्या पालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेशाचा सिलसिला आता सुरू झाला आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या धर्तीवर शनिवारी अंधेरी पूर्व,विजयनगर येथील सिंम्फोनी हॉल मध्ये उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा क्षेत्रातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा स्थानिक खासदार व शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांनी आयोजित केला होता. यावेळी मनसेच्या उत्तर पश्चिम जिल्ह्याच्या उपाध्यक्ष सुगंधा शेट्ये यांनी प्रभाग क्रमांक ५२च्या महिला अध्यक्ष, ८ महिला उपशाखाध्यक्ष यांच्यासह येथील अनेक महिलांनी शिवसेनेत प्रवेश केला. 

राज्याचे उद्योगमंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी सुगंधा शेट्ये यांच्या हातात शिवधनुष्य बांधले.शेट्ये यांनी १९९२ ते १९९७ आणि २००२ ते २००७ पर्यंत शिवसेनेचे नगरसेवकपद भूषवले होते. त्यांनी २०१२ मध्ये मनसेत प्रवेश केला.५ वर्षे त्या मनसेच्या जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्राच्या विभागध्यक्ष होत्या. तर गेली दोन वर्षे त्या मनसेच्या उत्तर पश्चिम जिल्ह्याच्या उपाध्यक्ष होत्या. २०१७ च्या पालिका निवडणुकीत त्यांनी प्रभाग क्रमांक ५२ त्यांनी मनसेतर्फे निवडणूक लढवली होती आणि त्यांना २६१० मते मिळाली होती.त्यांच्या दांडगा जनसंपर्क असून त्यांच्या प्रवेशाने येथे शिवसेनेला अधिक बळकटी येईल, अशी येथे चर्चा आहे.

माझा मूळ पिंड हा शिवसेनेचा आहे. शिवसेनाप्रमुख हे माझे आराध्य दैवत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीने मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणात आला. त्यांच्या कामगिरीवर मी भारावून गेले आणि शिवसेनेत माझ्या स्वगृही मी परत आले. आगामी पालिका निवडणूकीत माझ्यावर जी जबाबदारी पक्षश्रेष्ठीं टाकतील ती निष्ठ्येने पार पाडीन असे त्यांनी लोकमतला सांगितले. राज्याचे परिवहन मंत्री विभागप्रमुख अँड.अनिल परब,माजी राज्यमंत्री व आमदार रवींद्र वायकर,शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोद, आमदार, विभागप्रमुख सुनील प्रभू, आमदार रमेश लटके, मुंबईचे उपमहापौर अँड.सुहास वाडकर, आरोग्य समिती अध्यक्ष व महिला विभागसंघटक राजुल पटेल, महिला विभागसंघटक व नगरसेविका साधना माने आणि इतर मान्यवर उपस्थित होते. 

टॅग्स :शिवसेनामनसेसुभाष देसाई