अमित ठाकरेंसह मनसे नेते घेणार वाॅर्डस्तरावर आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:30 IST2021-02-05T04:30:00+5:302021-02-05T04:30:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यातील आगामी पालिका निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संघटनात्मक मजबुतीला सुरुवात केली आहे. प्रमुख महानगरातील ...

अमित ठाकरेंसह मनसे नेते घेणार वाॅर्डस्तरावर आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील आगामी पालिका निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संघटनात्मक मजबुतीला सुरुवात केली आहे. प्रमुख महानगरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी लोकसभा मतदारसंघनिहाय पथक तयार करण्यात आले आहे. यात एक मनसे नेता आणि एक सरचिटणीसाचा समावेश असणार आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांच्याकडे उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या मनसेत जोरदार हालचाली सुरू आहेत. प्रत्येक लोकसभा मतदारसंघापर्यंत पोहोचून वाॅर्ड स्तरावरील कार्यकर्त्यांशी संवाद साधत स्थानिक पातळीवरचा आढावा घेतला जाणार आहे. कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्याबाबतचा सविस्तर अहवाल २५ फेब्रुवारीपर्यंत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सादर केला जाणार आहे. सध्या मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांसाठी या टीम तयार करण्यात आल्या आहेत. आगामी काळात ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, नाशिक, पुणे अशा महानगरांसह राज्यातील प्रमुख जिल्ह्यात अशा टीमच्या माध्यमातून आढावा घेतला जाणार असल्याची माहिती मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली.
बुधवारी कृष्णकुंजवर झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. आगामी निवडणुकांत मित्र पक्षांबाबतही चाचपणी करण्यात आली. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज ठाकरे अयोध्या दौरा करणार आहेत. लवकरच तारीख आणि रूपरेषा नक्की केली जाईल, असे सरदेसाई यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले.
* मुंबईतील लोकसभा मतदारसंघनिहाय जबाबदाऱ्या
दक्षिण मुंबई - नितीन सरदेसाई आणि मनोज चव्हाण
दक्षिण मध्य - अविनाश अभ्यंकर आणि नयन कदम
उत्तर पूर्व - अमित ठाकरे आणि संदीप देशपांडे
उत्तर मध्य - संजय चित्रे आणि राजा चौघुले
उत्तर पश्चिम - शिरीष सावंत आणि आदित्य शिरोडकर
उत्तर मुंबई - बाळा नांदगावकर आणि संजय नाईक
-----------------------