प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध

By Admin | Updated: March 14, 2015 01:32 IST2015-03-14T01:32:53+5:302015-03-14T01:32:53+5:30

महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा अंतिम आराखडा प्रसिद्ध करण्यात आला आहे. आक्षेपांची दखल घेऊन अनेक बदल करण्यात आले आहेत.

Ward layout design famous | प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध

प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध

नवी मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा अंतिम आराखडा प्रसिद्ध करण्यात आला आहे. आक्षेपांची दखल घेऊन अनेक बदल करण्यात आले आहेत. निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी १७ मार्चला जाहीर करण्यात येणार असून २८ मार्चला अंतिम यादी प्रसिद्ध होईल.
निवडणूक विभागाने ७ फेब्रुवारीला आरक्षण सोडत व प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली होती. यानंतर नागरिकांसाठी प्रभाग रचनेची माहिती संकेतस्थळावर व महापालिका मुख्यालयासह विभाग कार्यालयामध्ये उपलब्ध करून देण्यात आली होती. आरक्षणावर हरकतींचा पाऊस पडला होता. १११ प्रभागांसाठी तब्बल २०७ हरकती प्राप्त झाल्या होत्या. या हरकतींवर सुनावणी घेण्यात आली होती. निवडणूक विभागाने हरकतींची छाननी करून त्यामध्ये किती तथ्य आहे याची पाहणी करून अनेक प्रभागांच्या रचनेमध्ये बदल केले आहेत. अंतिम प्रभाग रचना महापालिकेच्या सूचना फलकावर लावण्यात आली असून पालिकेच्या संकेतस्थळावरही उपलब्ध करून देण्यात आली आहे. निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. १७ मार्चला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रभागनिहाय मतदार यादीवर २३ मार्चपर्यंत सूचना मागविण्यात येतील. या सूचना व हरकतींची छाननी करून २८ तारखेला अंतिम यादी प्रसिद्ध होईल.
निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर झाली आहे. यामुळे आचारसंहिता कधीही लागू होऊ शकते. पुढील आठवड्यात ती जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पालिकेचे निवडणूक उपआयुक्त अमरीश पटनिगिरे यांनी या प्रक्रियेविषयी माहिती देताना सांगितले की, नागरिकांनी प्रभाग रचनेवर घेतलेल्या आक्षेपांचा विचार करून आवश्यक तेथे फेरबदल करण्यात आले आहेत. सर्व माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असून प्रारूप मतदार यादी, सूचना, हरकती व अंतिम मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: Ward layout design famous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.