वॉर रूम : यांनाच काही माहीत नाही तर लोकांना काय सांगणार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:06 AM2021-04-16T04:06:38+5:302021-04-16T04:06:38+5:30

सहभाग : मनोहर कुंभेजकर, शेफाली परब-पंडित, सचिन लुंगसे, मनीषा म्हात्रे, स्नेहा मोरे, सीमा महांगडे, गौरी टेंबकर-कलगुटकर, निखिल सावंत ------------------- ...

War Room: They don't know what to tell people ... | वॉर रूम : यांनाच काही माहीत नाही तर लोकांना काय सांगणार...

वॉर रूम : यांनाच काही माहीत नाही तर लोकांना काय सांगणार...

Next

सहभाग : मनोहर कुंभेजकर, शेफाली परब-पंडित, सचिन लुंगसे, मनीषा म्हात्रे, स्नेहा मोरे, सीमा महांगडे, गौरी टेंबकर-कलगुटकर, निखिल सावंत

-------------------

वॉर रूम : यांनाच काही माहीत नाही तर लोकांना काय सांगणार...

टीम लोकमत

मुंबई : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मुंबई महापालिकेने अनेक स्तरावर उपाययोजना आखल्या आहेत. आता दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या घटावी, परिस्थितीवर नियंत्रण मिळावे म्हणून प्रत्येक आघाडीवर काम केले जात आहे. याच उपाययोजनांचा एक भाग म्हणून आता वॉर रूम आणखी वेगाने कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मात्र काही वॉर रूम वगळता काही वॉर रूममधून पुरेशी माहिती मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांची आणि रुग्णांची हेळसांड होते आहे. बेड उपलब्ध आहे का, रुग्णवाहिका मिळेल का, तपासणी कुठे करायची अशा असंख्य प्रश्नांसह कोरोनाबाबतच्या इतर प्रश्नांचे समाधान वॉर रूमवर होणे गरजेचे असताना अद्यापही पुरेशी माहिती वेळेत उपलब्ध होत नसल्याने नातेवाईक आणि रुग्णांचा वेळ ही प्रक्रिया पूर्ण आणि माहिती घेण्यातच वाया जात असल्याचे स्पष्ट चित्र आहे.

-------------------

आर सेंट्रल : चाचण्यांसाठी जवळपास कोणते शासकीय रुग्णालय उपलब्ध आहे, अशी माहिती विचारली असता बोरिवली पश्चिमेला राजडा शाळेजवळ पालिकेचे हेल्प पोस्ट आहे, तसेच बाभई नाक्याजवळही आहे. येथे मोफत कोविड चाचणी सकाळी १० ते ४ या वेळेत करून मिळेल. त्यानंतर रिपोर्ट तपासून मदतीसाठी कॉल केल्यास लक्षणे पाहून क्वारंटाइन कुठे, कसे व्हायचे याचे मार्गदर्शन मिळेल. अधिक त्रास होत असल्यास बेड्स उपलब्ध करून देण्याचीही सोय होईल, असे सांगण्यात आले.

आर साऊथ : शासकीय केंद्रात लसीकरणासाठी काय करावे लागेल? अशी माहिती विचारली असता. कांदिवलीमधील शताब्दी रुग्णालयात लसीकरणाची सेवा उपलब्ध आहे. त्यासाठी आधी नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून, आरोग्य सेतूवरून नोंदणी कशी करावी यासंदर्भातील माहिती दिली. त्यानंतर खासगी रुग्णालयातही कुठे आणि कसे लसीकरण उपलब्ध आहे याची माहिती दिली.

टी : आयसीयू बेडबाबत चौकशी करताच त्यांनी रुग्ण आधी कुठे राहतो याबाबत विचारणा केली. पुढे रुग्णाची सविस्तर माहिती मागितली. मात्र बेड उपलब्ध आहे की नाही याबाबत सांगितले नाही. बेडबाबत आता सांगता येणार नाही. रुग्णाबाबतची सविस्तर माहिती कार्यालयाला कळविण्यात येणार त्यानुसार, कार्यालयाकड़ून पुढील पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगितले.

एस : रुग्ण मुलुंडच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल असून आयसीयू बेडची आवश्यकता असल्याबाबत विचारताच, त्यांनी थेट आयसीयू बेड उपलब्ध नसल्याबाबत सांगितले. शिवाय, खासगी रुग्णालयात प्रयत्न करा असा सल्लाही दिला. खासगी रुग्णालयातील माहितीबाबत चौकशी करताच त्याबाबतचा कुठलाच तपशील आपल्याकडे नसल्याचे सांगितले.

ई : मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे खाट उपलब्धतेसाठी बरीच धडपड करावी लागत आहे. खाटेच्या उपलब्धता तपासण्यासाठी ई विभागाच्या वॉर रूमकडून २५ मिनिटे ताटकळत ठेवण्यात आले. त्यानंतर रुग्ण राहत असलेल्या विभागात खाट उपलब्ध होऊ शकत नसल्याचे नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले. तसेच, रुग्ण सौम्य वा लक्षण विरहित असल्यास घरी वा संस्थात्मक विलगीकरणाचा पर्यायही सुचविण्यात आला.

एफ साऊथ : एफ साऊथ विभागाच्या नियंत्रण कक्षाला खाटेसाठी संपर्क केला असता केवळ १५ मिनिटांच्या आत पालिकेच्या केईएम रुग्णालयात वा परळ येथील नजीकच्या खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागाचा पर्याय सुचविला. त्यानंतर रुग्णाचा संपर्क व माहिती घेऊन काही वेळाच्या अंतराने खाट मिळाली की नाही हे तपासण्यासाठी संपर्क करणार असल्याचीही सूचना नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.

पी नॉर्थ : सहा महिन्यांपूर्वी कोरोनाची सौम्य लक्षणे होती. त्यातून मी रिकव्हर झाले, मात्र सध्या डोके दुखते आणि विस्मरणाचा त्रास होतोय. तर पोस्ट कोविडसाठी कोणाला भेटता येईल. यावर येथून सांगण्यात आले की बातम्यांमध्ये दाखवले जातच आहे. तुम्ही यूट्युबवर पाहा काय करायचे ते, हा फोन वॉर रूमला केला आहे, असे म्हणत वैतागत फोन आदळण्यात आला.

आर साऊथ : आरटी-पीसीआर आणि अँटिजन निगेटिव्ह आली असेल तरी सिटी स्कॅन करणे गरजेचे आहे का? बहिणीच्या पोटात दुखत आहे त्यामुळे आणि फॅमिली डॉक्टरकडून सिटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला गेलाय, आपण मार्गदर्शन कराल का? यावर दोन्ही अहवाल निगेटिव्ह आहेत तर तुम्हाला आवश्यक वाटत असेल तर सिटी स्कॅन करा. अन्यथा अधिक माहितीसाठी मी आमच्या डॉक्टरांशी आपले बोलणे करून देते, अशी माहिती देण्यात आली.

पी साऊथ : पेशंटची ऑक्सिजन लेव्हल किती आहे. रिपोर्ट कसा आहे, कमी लक्षणे असतील तर घरी होम क्वारंटाइन होऊ शकतो का? असे विचारण्यात आले. आपल्याला आम्ही नेस्को, बीकेसी, दहिसर कोविड सेंटरला बेड शिल्लक असून येथे आम्ही बेड देऊ शकतो. आपले नाव काय, फोन नंबर द्या, आम्ही परत संपर्क साधतो, असे उत्तर देण्यात आले.

के वेस्ट : आमच्या वॉर्डमध्ये ९ हॉस्पिटल असून येथील सर्व बेड फुल्ल आहेत. आपण सध्या रुग्णाला आहे त्या ल्सगी हॉस्पिटलमधून शिफ्ट करू नका, असे सांगण्यात आले.

एम ईस्ट : विभागातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी खाटा उपलब्ध आहेत का, याबद्दल विचारले असता हेल्पलाइनवरून आधी आपण कोणत्या परिसरातून बोलताय हे विचारण्यात आले. त्यानंतर सांगितले की कोरोनाबाधित रुग्णांची स्थिती कशी आहे यावरूनच आम्ही खाट उपलब्ध करायची की नाही हे ठरवितो. जर कोरोनाबाधित रुग्णात अतिशय सौम्य लक्षणे असतील किंवा लक्षणेच नसतील आणि त्याच्या घरात स्वतंत्र शौचालय आणि सर्वांपासून वेगळे राहण्याची व्यवस्था असेल तर त्याला घरातच उपचार दिले जातात. जर कोरोनाबाधित रुग्णाची स्थिती अतिशय गंभीर असेल आणि त्याला लक्षणेदेखील जाणवत असतील तर त्याच्यासाठी खाट उपलब्ध करून दिली जाईल. रुग्णास खासगी रुग्णालयात उपचार हवे असल्यास त्याच्या उपलब्धतेबाबतदेखील माहिती देण्यात येईल. मानखुर्दच्या पीएमजीपी कॉलनी येथे आयसोलेशन सेंटर उभारण्यात आले आहे. तिथे उपचार घेता येतील. तसेच गरज लागल्यास विभागात पालिकेचे शताब्दी रुग्णालय आहे.

एम वेस्ट : माझ्या कुटुंबापैकी अथवा मित्रांपैकी कोणाला बेडची आवश्यकता भासल्यास आपल्या विभागात त्या उपलब्ध आहेत का, असे विचारल्यास फोनवर बोलत असलेल्या इसमाने फोन थेट शेजारच्या इसमाकडे दिला. यावेळी त्याने सांगितले की, विभागात सध्या एकही बेड शिल्लक नाही. आपल्याकडे खासगी रुग्णालयाचा पर्याय आहे. जर आपल्याला गरज लागल्यास पी.एल. लोखंडे मार्ग येथील आयसोलेशन सेंटरमध्ये रुग्णास उपचारासाठी दाखल करू शकता.

डी : कोरोनाची चाचणी करावयाची आहे? याबाबतची माहिती विचारण्यासाठी फोन केला. मात्र तीन वेळा फोन करूनही तो घेण्यात आला नाही. चौथ्यांदा फोन केल्यावर कुठे तपासणी केली जाते याची माहिती देण्यात आली. शिवाय वेळेची नोंदही घ्या, असे सांगण्यात आले. याव्यतिरिक्त नायर रुग्णालयातदेखील तपासणी होत असून, तेथे जाण्याचा सल्ला देण्यात आला. दरम्यान, खासगी लॅबची माहिती, दूरध्वनी क्रमांकाबाबत माहिती विचारली असता ती आमच्याकडे उपलब्ध नाही, असे सांगण्यात आले.

पी साऊथ : माझ्या भावाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे. खाट मिळेल का? असे विचारण्यात आले. यावर समोरून काय लक्षणे आहेत? कधी चाचणी केली? असे प्रश्न विचारण्यात आले. ताप, डोकेदुखी होती. शुक्रवारी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सध्या घरी आहे. पण ॲडमिट करायचे म्हणते, अशी माहिती आम्ही दिली. त्यांचे नाव, वय, घरचा पत्ता, मोबइल क्रमांक द्या, अशी माहिती त्यांनी घेतली. यावर पुन्हा आम्ही का? घरी उपचार घेतो आहेत? तो... रुग्णालयात दाखल करणार का? असे विचारले असता ॲडमिट करावे लागेल त्यांना; त्यांचा संपर्क क्रमांक द्या, अशी माहिती नीट घेण्यात आली.

एल : वॉर्ड वॉर रूम क्रमांक ही सेवा खंडित करण्यात आली आहे.

ए : वॉर रूममधील डॉक्टर म्हणाले की मास्क बंधनकारक आहे. काही ठिकाणी लोक अनावश्यक कारणांसाठी बाहेर पडत आहेत. मात्र असे न करता लोकांनी आवश्यक करणासाठीच बाहेर पडावे. सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे.

बी : डॉक्टर म्हणाले की, कोरोना झाला तर घाबरून जाऊ नये. जर गंभीर लक्षणं दिसलीच तर डॉक्टरांच्या सल्ल्याने स्वतःला ॲडमिट करून घ्यावे. कोरोना बरा होऊ शकतो. मात्र. खबरदारी घेणेदेखील गरजेचे आहे.

-------------------

अशी मिळाली उत्तरे

- दक्षिण मुंबईमध्ये काही हद्दीत खाट उपलब्ध नाही, हॉटेल विलगीकरणाचा पर्याय आहे. तर काही ठिकाणी १५ मिनिटात खाट उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले.

- सामान्यांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा किंतुपरंतु राहू नये, त्यांना मोकळेपणाने मनातील प्रश्न विचारता यावेत, यासाठी तयार केलेली आर मध्य आणि दक्षिण वॉर्डातील वॉर रूमची सुविधा कांदिवली, बोरिवली आणि चारकोप, गोराईसारख्या परिसरांत चांगले कार्य करत आहे. लसीकरण कुठे करायचे? चाचण्यांसाठी कोणती रुग्णालये किंवा हेल्प पोस्ट परिसरात उपलब्ध आहेत. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतरची प्रक्रिया काय असेल आणि बेड कसे उपलब्ध करून दिले जातील याची माहिती या वॉर रूममध्ये मिळत आहे.

- पूर्व उपनगरात वॉर रूमवर ताण वाढत आहे. दिवसाला खूप कॉल येतात. अनेक जण रडून त्यांच्याकडे बेडबाबत चौकशी करतात, अशी अवस्था आहे.

- काही ठिकाणी यूट्युबवरून माहिती घेण्याचा सल्ला देण्यात आला.

- कोविड रुग्णांना बेड मिळत नाही. पालिकेची वॉर रूम कार्यरत नाही. आता बेडसाठी आम्ही कुठे संपर्क साधायचा? अशी रुग्णांच्या नातेवाइकांची तक्रार असताना काही वॉर रूम कार्यरत असल्याचे निदर्शनास आले.

Web Title: War Room: They don't know what to tell people ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.