कडोंमपासाठी वर्ष ठरले वांझोटे
By Admin | Updated: December 31, 2014 22:36 IST2014-12-31T22:36:21+5:302014-12-31T22:36:21+5:30
लाचखोरीच्या माध्यमातून घडलेले भ्रष्टाचाराचे दर्शन या पार्श्वभूमीवर सन २०१४ या मावळत्या वर्षाचा कल्याण डोंबिवली महापालिकेचा आलेख वादग्रस्त असाच राहीला.

कडोंमपासाठी वर्ष ठरले वांझोटे
प्रशांत माने - कल्याण
अपूर्ण राहीलेले विकासाचे प्रकल्प आणि त्यांचा उडालेला बोजवारा तसेच लाचखोरीच्या माध्यमातून घडलेले भ्रष्टाचाराचे दर्शन या पार्श्वभूमीवर सन २०१४ या मावळत्या वर्षाचा कल्याण डोंबिवली महापालिकेचा आलेख वादग्रस्त असाच राहीला. खड्डेमय रस्ते,कचरा डंपिंग हे मुद्दे जैसे थे च राहीले असताना सिटी पार्क असो अथवा मुबलक पाणीपुरवठा योजनेसारखे महत्वाकांक्षी प्रकल्प अंमलबजावणी अभावी कागदावरच राहीले. परिणामी आगामी वर्षात २०१५ मध्ये होणारी केडीएमसीची सार्वत्रिक निवडणुक सत्ताधा-यांसह विरोधकांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे.
लोकसंख्येच्या निकषानुसार ड वर्गात असलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेला सन २०१४ मध्येच क वर्गात जाण्याचा बहुमान प्राप्त झाला. पत वाढली पण त्यामानाने दर्जा वाढला का? हा संशोधनाचा विषय ठरत असताना भ्रष्टाचाराची प्रकरणे यंदाच्या वर्षात ही समोर आली. बीएसयुपी योजनेमधील भ्रष्टाचार असो अथवा सिमेंट रस्त्यांना गेलेले तडे असो ही यामधून प्रकल्प वादाच्या भोव-यात सापडले असताना लाचखोरीचे दर्शन ही या वर्षात घडले. सन २०१४ च्या सुरूवातीलाच फेब्रुवारी मध्ये क प्रभाग क्षेत्र अधिकारी गणेश बोराडे हे लाचलुचपत विरोधी पथकाच्या कारवाईत जेरबंद झाले. ही घटना ताजी असतानाच एप्रिल मध्ये ब प्रभाग क्षेत्र अधिकारी दत्तात्रय मस्तूद हे लाचखोरीत पकडले गेले. त्यांच्याबरोबरच नगरसेवक विद्याधर भोईर हे देखील पकडले गेल्याने भ्रष्टाचारात अधिका-यांबरोबरच लोकप्रतिनिधींचा सहभाग असतो हे उघड झाले. या लाचखोरांच्या माध्यमातून भ्रष्टाचाराचे दर्शन घडले असताना लाचखोरीच्या प्रकरणात निलंबित असलेल्या सुनिल जोशीला पुन्हा सेवेत घेण्याचा आयुक्त रामनाथ सोनवणे यांचा निर्णय वादग्रस्त ठरला. याचबरोबर लोकसभा निवडणुकीच्या काळात आचारसंहितेच्या अंमलबजावणीत केलेली कसुरता यात आयुक्त शंकर भिसे यांची झालेली उचलबांगडी, नगरसेविकेच्या अपहरण नाटयाने वादग्रस्त ठरलेली स्थायी समिती सभापती निवडणूक, आचारसंहीता काळात बोलाविलेली स्थायी समितीची बैठक, मनसेचे गेलेले विरोधी पक्षनेते पद, एलबीटी की जकात यासंदर्भात कायम राहीलेला वाद, टिटवाळा येथिल केडीएमसीच्या तलावात बोट बुडून बापलेकाचा झालेला मृत्यु,नेतीवली टेकडी परिसरात दरड कोसळुन ७ जण जखमी आदि घटना मावळत्या २०१४ सालात महत्वपूर्ण ठरल्या.
४लोकसंख्येच्या निकषानुसार ड वर्गात असलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेला सन २०१४ मध्येच क वर्गात जाण्याचा बहुमान प्राप्त झाला. पत वाढली पण त्यामानाने दर्जा वाढला का? हा संशोधनाचा विषय ठरत असताना भ्रष्टाचाराची प्रकरणे यंदाच्या वर्षात ही समोर आली. बीएसयुपी योजनेमधील भ्रष्टाचार असो अथवा सिमेंट रस्त्यांना गेलेले तडे असो ही यामधुन प्रकल्प वादाच्या भोव-यात सापडले असताना लाचखोरीचे दर्शन ही या वर्षात घडले.
४केडीएमटीसाठी २०१४ वर्ष खडतर ठरले. अपुरे उत्पन्न आणि वाढता खर्च या विवंचनेत कर्मचा-यांना वेतन देणे ही अशक्य होऊन बसले. त्यात गाडयांना आगी लागण्याचे सत्र यंदाही कायम राहीले. यात दोन गाडयांना आगी लागल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे पहावयास मिळाले. २२ जानेवारीला केडीएमटीच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला मंजूरी मिळाली परंतु आजतागायत त्यांच्या आरक्षित जागा नावावर न झाल्याने नव्याने दाखल होणा-या बसेस ठेवायच्या कुठे?हा प्रश्न कायम राहीला आहे.