Join us
Daily Top 2Weekly Top 5

राहायचे होते मामांकडे, ताबा दिला बाबांकडे; लहानग्याने मदतीसाठी भर कोर्टातच फोडला टाहो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 09:52 IST

मुलाची आई काही वर्षांपूर्वीच कर्करोगाने निवर्तली. आईच्या निधनानंतर मुलाच्या मामाने व आजोबांनी मुलाला त्यांच्या घरी नेले. मात्र, काही दिवसांनी वडिलांनी मुलाचा ताबा मिळावा, यासाठी न्यायालयीन लढाई सुरू केली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुलांना आपले लाड पुरविण्यासाठी दोन्ही पालक हवे असतात. बाबा सतत कामावर असतो म्हणून सुट्टीच्या दिवशी त्याच्या मागे-पुढे करणे, त्याच्याकडे खेळण्याचा हट्ट करणे, हा लहानग्यांच्या हक्कच...पण मंगळवारी उच्च न्यायालयात नेमके याउलट चित्र दिसले. बाबाच्या तावडीतून सुटण्यासाठी ११ वर्षांचा मुलगा टाहो फोडत होता. आक्रोश करत मदत मागत होता. बाबाच्या पकडीतून सुटण्यासाठी बाबावरच हल्ला करत होता. मात्र, त्याचे सगळे प्रयत्न अपयशी ठरले. उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा मुलाचा ताबा बाबांकडेच देण्याचे आदेश मुलाच्या आजोळच्यांना दिले.

मुलाची आई काही वर्षांपूर्वीच कर्करोगाने निवर्तली. आईच्या निधनानंतर मुलाच्या मामाने व आजोबांनी मुलाला त्यांच्या घरी नेले. मात्र, काही दिवसांनी वडिलांनी मुलाचा ताबा मिळावा, यासाठी न्यायालयीन लढाई सुरू केली. उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने मुलाचा ताबा त्याच्या जन्मदात्याकडे दिला. परंतु, मुलाने बाबाकडे जाण्यास नकार दिला. त्यानंतर मुलाच्या वडिलांनी आजोळच्यांविरोधात अवमान याचिका दाखल केली. न्या. अजय गडकरी व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी होती. न्यायालयाने मुलाचा ताबा त्याच्या वडिलांना देण्यासाठी पोलिसांना मदत करण्यास सांगितले.

दुपारी न्यायालयाच्या आवारातच मुलाचा ताबा वडिलांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. दुपारी वडिलांच्या ताब्यात देताच मुलाने आरडाओरडा करायला सुरुवात केली. वडिलांनी त्याला घट्ट पकडल्यावर त्याने पकडीतून सुटण्यासाठी वडिलांवरच हल्ला केला आणि पळ काढला आणि मामाकडे गेला. मामाने कसेबसे समजावून त्याला पुन्हा न्यायालयात आणले. मामाच्या वकिलांनी घडलेला प्रसंग न्यायालयाला सांगितला आणि सरकारी वकिलांनीही त्याचे समर्थन केले. मात्र, न्यायालयाने वकिलांना सुनावले. 

 ‘’गेल्या काही सुनावणीदरम्यान आम्ही तुमचे वर्तन पाहात आहोत. तुम्ही अशिलाला शिकवत आहात आम्ही तुम्हाला इशारा देत आहोत,’’ असे न्यायालयाने संतापत म्हटले. मात्र, वकिलांनी आपण अशिलाला शिकवत नसल्याचे न्यायालयाला सांगितले. अखेरीस न्यायालयाने पोलिसांच्या उपस्थित मुलाचा ताबा वडिलांच्या निवासस्थानाजवळ देण्याचा आदेश आजोळच्या नातेवाइकांना दिला.

टॅग्स :उच्च न्यायालय