Join us
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक अधिवासाचा फील घ्यायचाय, राणीच्या बागेत चला !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 10:17 IST

राणीच्या बागेत बहरणार नवीन रोपवाटिका, उद्यानाचा विकास होणार. 

मुंबई : रचना संसदच्या जागेवर या आधी राणीच्या बागेकडून संकल्पनेवर आधारित लँडस्केप गार्डनिंग, जंगल यांची निर्मिती करण्यात आली आहे. यापुढे अशाच प्रकारे उर्वरित जागेवर ही राणी बाग प्राधिकरणाकडून विविध संकल्पनावर आधारित उद्यानाचा विकास करण्यात येणार असल्याची माहिती वीर जिजामाता भोसले प्राणी संग्रहालयाचे संचालक संजय त्रिपाठी यांनी दिली. यासंदर्भात पालिका प्रशासनाकडून निसाका प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच राणीच्या बागेत पर्यटकांसाठी नवीन पर्वणीचा लाभ घेता येणार आहे.

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयाला देशविदेशातील पर्यटक भेट देतात. त्यांच्यासाठी ही राणीची बाग आकर्षणाचे केंद्र असले, तरी आर्किटेक्चर महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी हे शिक्षणाचे ठिकाण बनले आहे. राणीच्या बागेचा काही भाग प्रशासनाकडून लँडस्केपिंग पद्धतीने विकसित केला आहे. याचा उर्वरित भाग आता याच पद्धतीने विकसित करण्यात येणार आहे.  अर्थसंकल्पात याविषयी माहिती देण्यात आली असून, जुन्या रोपवाटिका जागेवर थीम आधारित नवीन उद्यान व विस्तारित भूखंडावर एक नवीन रोपवाटिका संकुल कार्यान्वित करण्यात येणार आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात  ७४.३० कोटींची तरतूद :

महानगरपालिकेच्या २०२४-२५च्या अर्थसंकल्पात वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील आधुनिकीकरणाच्या कामासाठी ७४.३० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मागच्या वर्षी २०२३-२४ या वर्षासाठी केवळ २३.५२ कोटींची रक्कम प्रास्ताविण्यात आली होती.  आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये पेंग्विन कक्षासमोर ॲक्वा गॅलरी आणि परिसरातील अंतर्गत रस्त्यांची कामे हाती घेण्यात येणार आहेत.

मफतलालच्या जागेवर रोपवाटिका :

१)  मफतलाल मिलची १० एकर जमीन भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालयाला मिळाली आहे. 

२) या जागेवर रोपवाटिका साकारण्यात येणार आहे. ही रोपवाटिका उद्यान विभागाच्या अखत्यारित असणार असून, ती कोणत्या पद्धतीने व कशी विकसित करायची याचा निर्णय उद्यान विभाग घेणार आहे. 

३) मफतलाल मिलच्या जागेवर साकारण्यात येणाऱ्या रोपवाटिकेमुळे राणी बागेत आल्यावर नैसर्गिक अधिवासाचा अनुभव मिळणार आहे.

टॅग्स :मुंबईराणी बगीचा