Sharad Pawar News: "आज एक छोटासा पण एक अतिशय आगळा वेगळा सोहळा आयोजित केला गेला आहे. हे स्टेडियम वानखेडे साहेबांच्या नावाने आहे. मला आठवतंय, त्या काळामध्ये मी क्रीडा खात्याचा मंत्री होतो. ही जागा देण्यापासून ते स्टेडियम उभं करण्यापर्यंत वानखेडेंचे कष्ट होते आणि आम्हा सर्वांची त्यांना साथ होती. त्यामध्ये काही नामवंत क्रिकेट खेळाडू यांचं योगदान मोठं होतं. यामध्ये पॉली उमरीगर आणि त्यांच्या त्या काळातले सहकाऱ्यांचं स्मरण प्रकर्षाने करावं लागेल", अशा भावना शरद पवार यांनी व्यक्त केल्या.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
'मुंबई क्रिकेट असोसिएशन'च्या वतीने वानखेडे स्टेडियममधील स्टॅण्ड नामकरण कार्यक्रम शुक्रवारी सायंकाळी पार पडला. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं.
शरद पवार म्हणाले, "या स्टेडियमचा एक इतिहास आहे. एका मॅचमध्ये निर्णयावरून मतभेद झाले आणि त्याचा परिणाम काय झाला तर क्रिकेटच्या संबंधी आस्था असलेल्या लोकांनी स्टेडियम सोडलं आणि ते ग्राऊंडमध्ये शिरले. नंतर त्यांनी स्टेडियमलाही लक्ष्य केलं आणि हे स्टेडियम उद्ध्वस्त केलं. त्यावेळेला साहजिकच पुन्हा एकदा हे स्टेडियम उभं करण्याचं आव्हान मुंबई क्रिकेट असोशिएशनवर पडलं. पण आनंद आहे की, मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या काही उद्योगसमूहांनी आवश्यक आर्थिक सहाय्य करण्याची भूमिका घेतली आणि त्याचा परिणाम हे स्टेडियम वर्ल्ड कप सुरु होण्याआधी आपण उभं करू शकलो."
'मुंबई क्रिकेट असोसिएशनचा मी आभारी'
"स्टेडियम उभं राहिलं आणि आजमितीपर्यंत खेळासंबंधीचं कर्तृत्व आपले खेळाडू दाखवतच आहेत पण प्रश्न आला यानिमित्ताने काही सहकाऱ्यांचं स्मरण कायम कसं राहील याची काळजी घ्यायची. म्हणून विजय मर्चंट असतील, सुनील गावस्कर असतील, दिलीप वेंगसरकर असतील, रवी शास्त्री असतील आणि अन्य नामवंत क्रिकेटीअर्स ज्यांचं योगदान या क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर होतं. ज्याची नोंद अभिमानाने मुंबईने करावी म्हणून त्यांचं काही ठिकाणी स्टॅण्ड नामकरणाचा निर्णय घेतला", असे शरद पवार म्हणाले.
वाचा >>सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
शरद पवारांनी कार्यक्रमात बोलताना सांगितले की, "हाच धागा पकडून आणखी आपण नवीन उपक्रम हातामध्ये घेतोय. भारताचा यशस्वी कर्णधार म्हणून रोहितचं नाव या देशातील तरुण पिढीच्या मनामनात आहे, क्रिकेट रसिकांच्या घराघरात पोहोचलेलं आहे. हे भारताचं वैभव त्यांच्या कर्तृत्वानं, कष्टानं आणि उत्तम खेळानं निर्माण झालं आहे आणि हे मुंबईकरांनाही अभिमान वाटणार आहे. त्याची आठवण कायम रहावी म्हणून स्टॅण्डला नाव देण्याचा उपक्रम घेतला जातोय, यासाठी मुंबई क्रिकेट असोशिएशन ह्या संस्थेचा मी आभारी आहे."
स्टॅण्डला शरद पवारांचं नाव का दिलं?
"आता या सगळ्या नावांमध्ये स्टॅण्डसाठी माझंही नाव का घेतलं मला माहित नाही. मी सांगत होतो की, हे फक्त क्रिकेटर्सपूर्ती मर्यादित ठेवा. पण नंतर त्यांनी त्यांची भूमिका विशद केली कि, ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून योगदान मोठं असतं आणि त्याबद्दलचाही सन्मान केला गेला पाहिजे, म्हणून मुंबई क्रिकेट असोशिएशनने हा निर्णय घेतला", असे शरद पवार यांनी सांगितले.
"मी त्यांचा आभारी आहे. त्यांना एवढंच सांगेन कि, आपला हा जो ऋणानुबंध आहे तो कायमचा राहील. ह्या संस्थेसाठी, ह्या वास्तूसाठी आणि ह्या खेळाडूंसाठी जे काही करण्याची जबाबदारी आम्हा सर्वांवर असेल आणि ती जबाबदारी पेलण्यासाठी आम्ही असो किंवा मुंबईमधला क्रिकेटप्रेमी असो कधीही मागे राहणार नाही, एवढाच विश्वास निश्चितपणे देतो", अशा भावना शरद पवार यांनी व्यक्त केल्या.