वरळीत भिंत कोसळून १ ठार, ३ जखमी!
By Admin | Updated: July 29, 2015 02:20 IST2015-07-29T02:20:33+5:302015-07-29T02:20:33+5:30
वाकोल्यात झोपडीवर भिंत कोसळून ४ जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेला २४ तास उलटत नाही तोवर वरळीमध्येही भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे.

वरळीत भिंत कोसळून १ ठार, ३ जखमी!
मुंबई : वाकोल्यात झोपडीवर भिंत कोसळून ४ जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेला २४ तास उलटत नाही तोवर वरळीमध्येही भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. सुनील ठोंबरे (४०) असे मृताचे नाव असून, उर्वरित तीन जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रविवारी मध्यरात्री पडलेल्या पावसामुळे वाकोला येथे झोपडीवर भिंत कोसळून चौघांचा मृत्यू झाला होता, तर ५ जखमी झाले होते. सोमवारीही पडलेल्या पावसामुळे रात्री वरळी येथील डॉ. अॅनी बेझंट मार्गावरील सासमीरा महाविद्यालयामागे भिंत कोसळून ४ व्यक्ती जखमी झाल्या. या चौघांनाही केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यापैकी सुनील ठोंबरे यांचा मंगळवारी दुपारी मृत्यू झाला. इतर तिघांपैकी एकाला उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून, दोघांवर उपचार सुरू आहेत. दोघांपैकी एकाची प्रकृती अत्यवस्थ असून, अन्य जखमीची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान, मंगळवारीही पावसाचा जोर कमी-अधिक होत असतानाच शहरात १, पूर्व उपनगरात १ आणि पश्चिम उपनगरात १ अशा ३ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. शिवाय पश्चिम उपनगरात एकूण २ ठिकाणी झाडे पडली. (प्रतिनिधी)
मुलुंडमधील नानेपाडा येथे झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला, तर दोन जखमी झाले. सदाशिव सावंत (६५) असे मृताचे नाव असून, सुनील परब आणि रमेश चव्हाण अशी जखमींचे नावे आहेत. परब यांना वीर सावरकर रुग्णालयात तर चव्हाण यांना सायन रुग्णालयात दाखल केले आहे.