समुद्रकिनारी रोज चाला... मधुमेह होणार नाही!
By Admin | Updated: January 18, 2015 22:55 IST2015-01-18T22:55:54+5:302015-01-18T22:55:54+5:30
भारत देश ही मधुमेहाची राजधानी आहे. मधुमेहातून अंधत्व येण्याच्या प्रक्रियेत आपण जगात दुस-या क्रमांकावर आहोत.
समुद्रकिनारी रोज चाला... मधुमेह होणार नाही!
नांदगाव : भारत देश ही मधुमेहाची राजधानी आहे. मधुमेहातून अंधत्व येण्याच्या प्रक्रियेत आपण जगात दुस-या क्रमांकावर आहोत. मधुमेह असणा-यानी गोड पदार्थ खाणे शरीरास घातक आहे. मात्र हा रोग मुळापासून नाहीसा करायचा असेल तर समुद्रकिनारी रोज ४५ मिनिटे चाला. तुमचे आयुर्मान निश्चितच वाढेल. चालल्यामुळे शरीरातील साखर नाहीशी होवून प्रकृती चांगली राहण्यास मदत होते, असा महत्त्वपूर्ण सल्ला जे.जे.रूग्णालयाचे अधिष्ठाता पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. तात्याराव लहाने यांनी मुरूड येथे दिला.
मुरूड येथे आयोजित नेत्रचिकित्सा व शस्त्रक्रिया शिबिर कार्यक्रमात डॉ. यावेळी व्यासपीठावर डॉ. लहाने यांनी मुक्त संवाद साधला. यावेळी रागिणी पारेख, उपजिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, तालुका प्रमुख प्रशांत मिसाळ, गटनेते महेश भगत, माजी नगराध्यक्षा कल्पना पाटील आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. लहाने यांनी वयाच्या ४० वर्षांनंतर डोळे तपासणे आवश्यक असल्याचे सांगितले. मधुमेह व काचबिंदू हे मानवासाठी मृत्यूच्या जवळ घेवून जाणारे आहेत. लहान मुलांना भ्रमणध्वनी व आयपॅड देवू नये, कारण त्यांच्या प्रकाशामुळे डोळयाच्या बाहुल्या लहान होतात.
मुंबईसारख्या शहरातील शाळांमधून सात लाख ५० हजार मुलांची आम्ही तपासणी केली. तेव्हा ९२ हजार मुलांना चष्मा लागला. याचा पालकांनी विचार करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. डोळ्याला तजेलपणा येण्यासाठी गाजर, पपई, मासे खाणे आवश्यक आहे. आयुर्मान वाढण्यासाठी तळलेले पदार्थ खाऊ नये, असेही त्यांनी सांगितले.
लेडी कुलसूम बेगम येथे प्रसूती कक्ष सुरू होण्यासाठी आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांच्याशी बोलणार असून हे काम लवकरच होईल असे अभिवचन दिले. हजारो विद्यार्थ्यांना समुपदेशन करणाऱ्या उत्कृष्ट निवेदिका असणाऱ्या दीपाली दिवेकर यांचा सत्कार डॉ. लहाने यांच्या हस्ते करण्यात आला. शहर अध्यक्ष प्रमोद भायदे यांनी केवळ समाजाचे हित जोपासण्यासाठीच आम्ही अशी शिबिरे आयोजित करत असल्याचे सांगितले. (वार्ताहर)