सात महिन्यांपासून सुरक्षारक्षक वेतनवाढीच्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: July 31, 2015 03:11 IST2015-07-31T03:11:26+5:302015-07-31T03:11:26+5:30
खासगी आणि सुरक्षा मंडळातील सुरक्षा रक्षकांची वेतनवाढ १ जानेवारीपासून होणे गरजेचे होते. परंतू अद्यापही सुरक्षा रक्षकांचे वेतन आणि भत्तेवाढ न झाल्याने सुरक्षा रक्षक आक्रमक झाले आहेत.

सात महिन्यांपासून सुरक्षारक्षक वेतनवाढीच्या प्रतीक्षेत
मुंबई : खासगी आणि सुरक्षा मंडळातील सुरक्षा रक्षकांची वेतनवाढ १ जानेवारीपासून होणे गरजेचे होते. परंतू अद्यापही सुरक्षा रक्षकांचे वेतन आणि भत्तेवाढ न झाल्याने सुरक्षा रक्षक आक्रमक झाले आहेत. सुरक्षा रक्षकांनी महाराष्ट्र सुरक्षा रक्षक आघाडीच्या नेतृत्वाखाली लढा उभारण्याची तयारी केली असून लवकरच मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी धडक देण्याचा निर्धार सुरक्षा रक्षकांनी केला आहे.
सुरक्षा रक्षकांच्या वेतनवाढीच्या मागणीसाठी महाराष्ट्र सुरक्षा आघाडीमार्फत नुकतेच आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची दखल घेण्यात न आल्याने आघाडीने राज्यातील सुरक्षा रक्षकांना पुन्हा लढ्याची हाक दिली आहे. सुरक्षा रक्षकांना १ जानेवारी २0१५ पासून सुधारित वेतन व भत्तेवाढ लागू होणे आवश्यक होते. परंतू अद्यापपर्यंत सुरक्षा रक्षकांना वेतनवाढ झालेली नाही. सुधारित वेतन मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईची अधिक झळ सोसावी लागत आहे.
खासगी इमारतींची सुरक्षा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यामुळे शासनावर कोणताही भार पडणार नसून तो संबंधीत कंपन्यांवर पडणार आहे. त्यामुळे शासनाने वेतन आणि भत्तेवाढीस मान्यता द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र सुरक्षा रक्षक आघाडीचे अध्यक्ष कॉ. उदय भट यांनी केली आहे. सुरक्षा रक्षकांना तातडीने वेतनवाढ न दिल्यास मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानावर मोर्चा काढण्याचा इशाराही भट यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)