Join us  

आघाडी सरकारची पाऊले चालती धार्मिक स्थळांची वाट...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2021 6:22 AM

मंदिरे, तीर्थक्षेत्र विकासाचे सरकारचे ‘धार्मिक कार्ड’; हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप-शिवसेनेत कलगीतुरा सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाविकास आघाडी सरकारने राज्यातील मंदिरे, तीर्थक्षेत्रांच्या विकास, संवर्धन करण्याचा संकल्प सोडत धार्मिक कार्ड आणले आहे. एकीकडे हिंदुत्वाच्या मुद्दयावरून भाजप-शिवसेनेत कलगीतुरा चालला असताना राज्याच्या अर्थसंकल्पात धार्मिक स्थळांच्या विकासावर सरकारने लक्ष केंद्रित केले आहे.

देशातील बारा  ज्योतिर्लिंगांपैैकी श्री क्षेत्र परळी वैजनाथ ( जि. बीड), श्री क्षेत्र औंढा नागनाथ (जि. हिंगोली), श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक), श्री क्षेत्र भीमाशंकर (जि. पुणे), श्री क्षेत्र जेजुरी गड  (जि. पुणे), श्री क्षेत्र बिरदेव देवस्थान, निरा व भीमा नदीच्या पवित्र संगमावर वसलेले श्री क्षेत्र निरा नृसिंहपूर (जि. पुणे), आरेवाडी  (जि. सांगली), राष्ट्रसंत तुकडोजी  महाराज श्री क्षेत्र मोझरी आणि श्री क्षेत्र कौंडण्यपूर ( जि. अमरावती), तसेच संत गाडगेबाबा निर्वाणभूमी, वलगाव (ता. जि. अमरावती), श्री क्षेत्र सप्तश्रृंगी गड (जि. नाशिक), संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज मंदिर, त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक), श्री क्षेत्र भगवानगड (जि. अहमदनगर), श्री क्षेत्र नारायण गड आणि श्री क्षेत्र गहिनीनाथ गड (ता. पाटोदा, जि. बीड), अष्टविनायकांपैकी मोरगाव, थेऊर, रांजगणगाव, ओझर, लेण्याद्री, महाड,पाली, तसेच सिद्धटेकच्या विकासासाठी निधी देण्यात येणार आहे.संत बसवेश्वर महाराज यांच्या स्मरणार्थ मंगळवेढा, जि. सोलापूर येथे स्मारक उभे करण्यासाठी सन २०२१-२२  मध्ये आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे अजित पवार यांनी सांगितले. 

प्राचीन मंदिरांच्या जतन व संवर्धनाला प्राधान्य; राज्यातील आठ मंदिरांचा करणार विकास

शेकडो वर्षांचा वारसा असलेल्या व स्थापत्य शैलीसाठी प्रसिद्ध प्राचीन मंदिरांचे जतन व संवर्धन केले जाईल. धूतपापेश्वर मंदिर ( ता. राजापूर, जि. रत्नागिरी), कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर  (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर), एकविरा माता मंदिर, कार्ले (ता. मावळ, जि. पुणे), गोंदेश्वर मंदिर (ता. सिन्नर, जि. नाशिक), खंडोबा मंदिर, सातारा (ता. जि. औरंगाबाद), भगवान पुरुषोत्तम मंदिर, पुरुषोत्तमपुरी (ता. माजलगाव, जि. बीड), आनंदेश्वर मंदिर, लासूर (ता. दर्यापूर, जि. अमरावती), शिव मंदिर, मार्कंडा (ता. चामोर्शी, जि. गडचिरोली) या मंदिरांचा त्यात समावेश आहे.

संत नामदेव महाराज यांनी वारकरी संप्रदायाचा देशभर विस्तार केला. २०२१ हे संत नामदेव महाराज यांचे ७५० वे जयंती वर्ष आहे. त्या निमित्ताने संत नामदेव महाराज यांचे जन्मस्थान श्री क्षेत्र नरसी नामदेव (ता. जि. हिंगोली) या तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्यासाठी  निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेले जगद्गुरू संत सेवालाल महाराजांचे समाधिस्थळ असलेल्या श्री क्षेत्र पोहरादेवी (ता. मानोरा, जि. वाशिम) या धार्मिक स्थळाच्या विकास आराखड्याची कामे प्रगतिपथावर आहेत. त्यासाठी आवश्यक तो निधी दिला जाईल.

टॅग्स :अर्थसंकल्पमंदिर